Home चंद्रपुर जिल्हा विशेष वासेरा ग्राम पंचायत वर महिलाराज

वासेरा ग्राम पंचायत वर महिलाराज

960

इच्छुकांचे सरपंच पदाचे ठरले दिवास्वप्न

सिंदेवाही : जिथे प्रशासनाच्या प्रक्रियेत समाजाच्या तळागाळातील लोकांचा सहभाग निश्चित केला जातो. ती ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत. ग्राम पंचायतीचा प्रमुख सरपंच असून सिंदेवाही तालुक्यातील वासेरा या ११ सदस्यीय ग्राम पंचायत वर लवकरच महिला राज येणार असल्याने सरपंच पदाचे डोहाळे लागलेल्या कार्यकर्त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले असल्याचे बोलल्या जात आहे.

.         ग्राम पंचायत ची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता वर्तवून प्रशासनाने थेट निवड होणाऱ्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले असून सिंदेवाही तालुक्यातील एकूण ५० ग्राम पंचायत पैकी २६ ग्राम पंचायत या महिलांसाठी राखीव झाल्या असून वासेरा ही ११ सदस्यीय असलेली ग्राम पंचायत अनुसूचित जमाती ( एस. टी.) या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली असल्याने येणाऱ्या पुढील निवडणुकी नंतर वासेरा ग्राम पंचायत वर महिला राज येणार आहे. यापूर्वी २०१० मध्ये सुद्धा ही ग्राम पंचायत अनुसूचित जमाती ( एस. टी) या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली होती. सन २००० सालापासून अनुसूचित जाती (एस.सी) या प्रवर्गाला ग्राम पंचायत मध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली नसल्याने अनेकांनी शंका व्यक्त केल्या आहेत. परंतु लोकसंख्येच्या दृष्टीने तालुक्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वाधिक जास्त असल्याने त्या प्रमाणात अनुसूचित जमाती या प्रवर्गाला १६ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यांचे तुलनेत अनुसूचित जाती या प्रवर्गाला तालुक्यात केवळ ६ जागा आरक्षित करण्यात आल्या असल्याने १९९५ पासून ज्या ग्राम पंचायत मध्ये (एस सी) चे आरक्षण जाहीर झाले नव्हते. त्या ग्राम पंचायत मध्ये आता (एस.सी) प्रवर्गाला आरक्षण देण्यात आले असल्याचे तहसीलदार संदीप पानमंद यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले आहे.

.     वासेरा ग्राम पंचायत ही संवेदनशील ग्राम पंचायत असून तालुक्यातील अनेकांच्या नजरा या ग्राम पंचायत कडे लागल्या असताना बुधवारी जाहीर झालेल्या ग्राम पंचायत सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये ही ग्राम पंचायत अनुसूचित जमाती (महिला) साठी राखीव झाली असल्याने सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या हवशा गवशांचे सरपंच पदाचे स्वप्न धुळीस मिळाले असल्याचे बोलल्या जात आहे. वासेरा ग्रामपंचायत ही अनुसूचित जमाती महिला साठी राखीव झाली असल्याने राजकीय पक्षांनी तात्काळ उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून महिला उमेदवारांसाठी अनेकजण संभ्रमात पडले असल्याचे बोलल्या जात आहे.

error: Content is protected !!