गंगासागरहेटी येथील घटना
नागभीड : तालुक्यातील तळोधी (बा) वनपरिक्षेत्रांतर्गत गंगासागर हेटी कक्ष क्रमांक ९९ मध्ये सकाळी 6.30 वाजता मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मारोती सखाराम बोरकर (60) असे मृतक इसमाचे नाव आहे.
. उन्हाळ्याला सुरुवात होताच वाघाच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही परिसरातील अनेक कुटुंब मोहफुला वर उपजीविका करत असून उन्हाळ्यातच वर्षभराचे बजेट ठरवितात. मात्र सध्या वाघाच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केले आहे तर अनेकांना जखमी केले आहे. दरम्यान मागील काही दिवसात वाघाच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ब्रम्हपुरी तालुक्यात एकाने वाघाच्या हल्ल्यात जीव गमावला. तत्पूर्वी सिंदेवाही तालुक्यात देखील वाघाने एकाचा बळी घेतला होता. उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाघ जंगलातून बाहेर गावात येत आहे. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
. नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रतील गंगासागर हेटी कक्ष क्रमांक ९९ मध्ये मारोती बोरकर हे नेहमीप्रमाणे मोहफुले वेचण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. यात . महेश गायकवाड, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु, ) ब्रम्हपुरी वनविभाग, अरुप कन्नमवार, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) तळोधी, ए. जी. मने, क्षेत्र सहाय्यक, तळोधी, आर. यु. भरणे, वनरक्षक, राकेश आहुजा, बॉयोलॉजीस्ट तसेच ईतर वनकर्मचारी घटनास्थळी उपस्थीत झाले. मृतकाचे शवविच्छेदनाकरीता उपजिल्हा रुग्णालय, नागभिड येथे पाठविण्यात आले.
. वाघाचे छायाचित्र मिळविणे करीता घटनास्थळ परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. व मानव- वन्यजीव संघर्ष होवू नये म्हणुन सदर परिसरात गस्त वाढविण्यात आली. सदर घटनास्थळाचा मौका पंचनामा करून मृत इसमाचा मुलगा पुंडलिक मारोती बोरकर, रा. गंगासागर हेटी यांना तातडीची आर्थिक मदत रोखीने देण्यात आले.


