चंद्रपूर : छत्रपती शंभाजी महाराज यांच्या बद्दल समाज माध्यमावर अवमानकारक मजकूर टाकणाऱ्या एका आरोपीला चिमूर पोलिसांनी अटक केली आहे. महाराजांच्या विरोधात अवमानकारक पोस्ट टाकल्यामुळे संभाजी बिग्रेडच्या शिवप्रतिष्ठान समुहाने आरोपीला अटक करण्याची मागणी केली. त्याच्या दुकानाची तोडफोड केली.
. चिमूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. या घटनेमुळे चिमुरात रात्री बारा ते एकच्या दरम्यान प्रचंड तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. शिवभक्त युवकांनी श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान मैदानात एकत्रित येऊन चिमूर शहर बंदला यशस्वी करण्याकरिता बाईक रॅलीच्या माध्यमातून शहरात जनजागृती केली. सकाळी 10 वाजता श्रीहरी बालाजी देवस्थान पटांगणातून निषेध मोर्चा काढण्यात आला. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेऊन निषेध मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा मधे सर्व धर्मातील शिव प्रेमी सहभागी झाले होते. हजारोच्या संख्येने निघालेल्या हा मोर्चा अतिशय शांततेत तहसील कार्यालय समोर आला. तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले. पोलिस प्रशासनाने दंगानियंत्रक पथकाला रात्री बोलावून चोख पोलिस बंदोबस्त लावला आहे.


