अवैध रेती वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर केले जप्त
सिंदेवाही : तालुक्यातील अनेक रेती घाट तस्करांनी पोखरले असल्याची सर्वत्र ओरड होत असताना तालुका महसूल प्रशासन ॲक्शन मोड वर आले आहे. या रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल अधिकारी – कर्मचारी यांची गस्त वाढवून बुधवारी सकाळी 7 वाजताच्या दरम्यान तालुक्यातील उमरवाही परीसरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर महसूल पथकाने छापा टाकत धडक कारवाई केली असल्याने नवरागावातील कुख्यात रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या असल्याचे बोलल्या जात आहे. या मोहिमेत तिन्ही ट्रॅक्टर जप्त करून सिंदेवाही तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले आहेत. या कारवाईने सिंदेवाही तालुक्यातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
. सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव परिसरातील तलाठी साजा क्रमांक 5 उमरवाही येथील मौजा कुकसीरिठ मधील उमा नदी पात्रात आज बुधवारी सकाळी 7 वाजता रेतीची वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. भरारी पथकास गस्ती दरम्यान कुकसीरिठ येथे असणाऱ्या उमा नदीच्या पात्रात रेतीने भरलेले 3 ट्रॅक्टर आढळून आले. पथकाने वाहन चालकांकडे रेती वाहतुकी करिता वैध परवान्याबद्दल विचारणा केली असता तिघांनीही कोणताही वैध परवाना नसल्याचे सांगितले. तीन ट्रॅक्टर पैकी एका ट्रॅक्टर चालकाने उमा नदी पात्रातच ट्रॉली रिकामी करून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परंतु भरारी पथकाने अटकाव करून ट्रॅक्टर पकडला. आणि पंचनामा केला. त्यामुळे अवैध रेती वाहतूक करत असल्याने तिन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात आणून जप्त करण्यात आले आहेत. सदर कारवाई सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मंगेश तुमराम, महसूल सेवक तुलसीदास गेडाम, आकाश श्रीरामे, सचिन सिडाम, नोमेश मेश्राम, शिपाई चक्रधर गेडाम यांनी केली आहे.
. सदर अवैध रेती वाहतूक करणारे तिन्ही ट्रॅक्टर वर पुढील दंडात्मक कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्याकडे प्रस्ताव पाठवीला आहे. अशी माहिती सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद यांनी दिली.


