Home चंद्रपुर जिल्हा विशेष पाचशे रुपयाची लाच स्वीकारताना सहाय्यक आरटीओला रंगेहात पकडले 

पाचशे रुपयाची लाच स्वीकारताना सहाय्यक आरटीओला रंगेहात पकडले

1086

अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

सहाय्यक निरीक्षकासह खाजगी कर्मचार्‍याला अटक 

राजुरा : प्रादेशिक परिवहन विभाग चंद्रपुर येथील सहाय्यक आरटीओ व एक खाजगी कर्मचारी (दलाल) यांना ट्रक चालकाकडून पाचशे रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीच्या पथकाने रंगेहात पकडले.  ही कारवाई तेलंगणा सीमेवर असलेल्या लक्कडकोट आरटीओ चेक पोस्ट वर करण्यात आली. या प्रकारामुळे प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

.      प्राप्त माहितीनुसार तक्रारदार हा तेलंगणातील आदिलाबाद येथील रहिवासी आहे. त्यांचे स्वतच्या मालकीचे ट्रक आदिलाबाद ते चंद्रपुर या मार्गावर नेहमी चालतात. दरम्यान लक्कडकोट येथिल आरटीओ तपासणी नाक्यावर असणारे आरटीओ अधिकारी वारंवार पैश्यासाठी नेहमी त्रास देतात. सततच्या त्रासाला कंटाळून सदर व्यावसायिकाचा ट्रक चालक शेख मोहसिन शेख मोबिन याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2025 च्या रात्री संबंधित चेक नाक्यावर सापळा रचला. दरम्यान घटनेच्या वेळी कर्तव्यावर असलेले आरटीओ सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभूते आणि त्याचा खाजगी कर्मचारी जगदीश डफडे उपस्थित होते. यावेळी तेलंगणा सीमेवर ट्रकला थांबविले. व कागदपत्रांची तपासणी केली. सर्व कागदपत्रे व गाडीचे वजन बरोबर असतानाही शिवाजी विभूते याने एंट्रीच्या नावाखाली पाचशे रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम देण्याचे ट्रक चालकाने मान्य करून हे पैसे स्वीकारताना साफळा तयार करून तैनात असलेल्या लाचलुचपत पथकाने त्यांना रंगेहात पकडले. व खाजगी कर्मचारी जगदीश डफळे व आरटीओ सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभुते या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता 56 हजार शंभर रुपये सापडले. या रक्कमेबाबत कुठलीही सबळ स्पस्टिकरण न दिल्याने सदर रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली असून दोन्ही आरोपींना राजुरा पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. संबंधित आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12 व 7 अ नुसार राजुरा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन बातमी लिहित पर्यंत आरोपींना न्यायालयात सादर करण्यात आले नव्हते.

चेकपोस्ट नेमनुकीसाठी अधिकार्‍यांची बोली                                                                                                                                        लक्कडकोट हा आंतरराज्यीय तपासणी नाका आहे. या ठिकाणी नेमणुक होण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ असल्याची चर्चा आहे. या चढाओढीत ज्याची बोली जास्त त्याची नेमणुक असा अघोषित नियम असल्याचेही बोलल्या जाते. अर्थात लावलेल्या बोलीपेक्षा जास्त वसुली करण्याचा गोरखधंदा आरटीओ अधिकाऱ्यांकडून होत असल्यास नवल नाही. राज्य सीमेवर असलेल्या या तपासणी नाक्यावरून रोज शेकडो मालवाहू वाहनांची रवानगी होत असते. शेजारील राज्यातून क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहनांची राजरोसपणे महाराष्ट्रात प्रवेश करत असतात. बल्लारपूर पेपर उद्योगासाठी लागणाऱ्या लाकडांचा पुरवठा देखील याच मार्गाने होतो. ही लाकूड वाहतूक करणारी वाहने क्षमतेपेक्षा अधिक वजनाची व नियमापेक्षा जास्त उंचीपर्यंत लाकुड भरून वाहतुक करतात.या वाहनांमधून कित्येकदा लाकडे घसरून अपघात होण्याची स्थिती निर्माण होते. मात्र तरीही आर्थिक लाभासाठी याकडे दुर्लक्ष केल्या जाते.

error: Content is protected !!