औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सफाई कामगार, शिल्पनिदेशक पदांसाठी ३५ हजारांची लाच
कंत्राटदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
चंद्रपूर : अभिजित इंटेलिजन्स, सिक्युरिटी ॲन्ड लेबर सप्लायर या कंपनीच्या संचालकाने नागभीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिर्देशक या पदाच्या भरतीसाठी २५ हजार तर सफाई कामगार पदासाठी एका महिलेकडून दहा हजार रूपये अशी ३५ हजारांची लाच मागितली होती. ती स्वीकारताना नागपुरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. नंदकिशोर पंजाबराव गवारकर (६१) असे लाचखोर संचालकाचे नाव आहे.
. चंद्रपुर जिल्ह्यात लाच खोरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. बल्लारपुर पोलिस स्टेशन येथील कार्यरत पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा याला 50 हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले. हे प्रकरण ताजे असतानाच आज बुधवारी अभिजित इंटेलिजन्स, सिक्युरिटी ॲन्ड लेबर सप्लायर या कंपनीचे संचालक नंदकिशोर पंजाबराव गवारकर यांनी नागभीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिर्देशक व सफाई कामगार या पदाच्या भरतीसाठी 35 हजारांची लाच स्वीकरतांना रंगेहात अटक केली. नंदकिशोर गवारकर हे नागपुर येथील रहिवासी असून त्यांच्या अभिजित इंटेलिजन्स, सिक्युरिटी ॲन्ड लेबर सप्लायर या कंपनीकडे नागभीडच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मनुष्यबळ पुरवठ्याचे कंत्राट आहे. तक्रारदार यांना शिल्पनिर्देशक म्हणून तासिका तत्वावर नियुक्ती पत्र देण्याकरता २५ हजार रुपये तर एका महिलेला कंत्राटी सफाई कामगार पदासाठी नियुक्तीपत्र देण्याकरिता १० हजार असे एकूण ३५ हजार रूपये लाचेची मागणी करून स्वतः स्वीकारून खाजगी ड्रायव्हर याचेकडून मोजून घेऊन स्वतःचे डावे बाजूचे टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवली. गवारकर यांना रंगेहाथ पकडून लाच रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई नागपुरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.


