ग्रामपंचायतीचा ठरावाची पोलीस प्रशासनाने घेतली दखल
ट्रान्सपोर्ट धारकांची घेतली बैठक
संदीप झाडे
माजरी : गावातील रस्त्याची क्षमता 10 टनाची आणि वाहतूक 50 टनाची यामुळे रस्त्याची ऐसीतैसी झाली. परिणामी अपघातात वाढ झाली. साधे पादचाऱ्यांना ही जाणे कठीण झाले होते. त्यामुळे माजरी ग्रामपंचायतने जड वाहतुकीवर बंदी घालण्याचा ठराव घेतला आणि याला पोलीस प्रशासनाने दुजोरा दिला. आणि ट्रान्सपोर्ट धारकांची बैठक घेत माजरी गावातून कायमस्वरूपी जड वाहनाना प्रवेश बंदी केली. या निर्णयाने ग्रामपंचायतीने दिलेल्या ठरावाचे महत्व किती व कसे हे सिद्ध झाले असून कोंडलेला गावाचा श्वास आता मोकळा होणार आहे
. माजरी गावातून ये-जा करणाऱ्या जड वाहनांवर आता पोलिसांनी माजरी ग्रामपंचायतीच्या जड वाहतूक बंदी घालण्याचा ठरवाची दखल घेत हे निर्बंध घातले आहेत. नवीन बनलेल्या कमी क्षमतेचा रस्ता, अवजड वाहनांची रहदारी, यामुळे कोंडलेला गावाचा श्वास आता काही प्रमाणात मोकळा होणार आहे. सर्व जड, अवजड वाहनांचा माजरी गावातून वाहतूक कायमस्वरूपी बंदी करण्यात आली आहे. हा आदेश माजरी पोलिस ठाण्यातील ठाणेदार अमितकुमार पांडेय यांनी सर्व ट्रान्सपोर्टर यांना दिला आहे.
. दरम्यान गावातून जड वाहतूक बंद व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीवरून गावातून सर्व प्रकारच्या जड वाहतूक बंद व्हावेत, असा ठराव माजरी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीमध्ये करण्यात आला. या ठरावाला विरोधी सदस्यांनी देखील पाठिंबा दर्शविल्याने आता माजरीतून जड वाहतूक बंद होणार आहे.
. माजी वस्ती व कॉलरी या रहिवाशी वस्तीमधून सार्वजनिक बांधकाम विभागाचा मेन रोड गेलेला आहे. यापूर्वी सदर रोडवरून मोठमोठे हायवा ट्रक व ओव्हरलोड वाहतुक चालत असल्याने माजरी वस्ती व कॉलरी परिसरातील रोड खराब झालेते आहेत. राद्या स्तिथीत नव्याने सदर रोडचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले. परंतु या रोडवरून पुन्हा हायवा ट्रक व जड वाहने सुरु असून सदर रोड लवकरच खराब होण्याची शक्यता आहे. तसेच सदर रस्ता वर्दळीचा असल्याने अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
. जड वाहतुकीमुळे प्रदूषणाची सुद्धा समस्या निर्माण झालेली आहे. तसेच या मार्गाची क्षमता जास्तीत जास्त १० ते १२ टन जड वस्तू वाहून नेण्याची आहे. परंतु या मार्गावरून दररोज ४० ते ५० टन माल भरलेले हायवा ट्रक ये -जा करत असल्याने हा मार्ग लवकरच खराब होऊन पुन्हा रस्त्यावर खड्डे पडण्याची शक्यता आहे. करीता माजरी वासियांच्या विनंतीला मान देऊन या मार्गावरील जड वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्यात यावी. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी वरोरा, प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर, पोलीस ठाणे माजरी या सर्वाना निवेदनासोबत ग्रामपंचायत ठरावाच्या प्रती पाठवून जड वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे. याच अनुषंगाने माजरीचे ठाणेदार अमितकुमार पांडेय यांनी शांतता कमेटी, ट्रान्सपोर्टर, ग्रामपंचायत सदस्यांची शुक्रवारी सकाळी १० वाजता बैठक लावली होती. बैठकीदरम्यान उपस्थित सर्वांनी देखील जड वाहतूक बंद झालेच पाहिजेत, अशी आग्रही मागणी यावेळी केली.
. मात्र, उपस्थित ट्रान्सपोर्टरांनी गावातून त्यांचे ट्रक जाण्यास प्रतिबंध लावल्याने नाराजी व्यक्त केली. दरम्यान सदर रस्त्याची क्षमता कमी असल्याने जड वाहने चालवता येऊ शकत नाही. जर कोणीही नियमांचे उल्लंघन करून या रस्त्यावर जड वाहने चालविली तर त्या वाहनांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे बैठकीला उपस्थित ट्रान्सपोर्टरांना माजरीचे ठाणेदार अमितकुमार पांडेय यांनी स्पष्ट सांगितले. या बैठकीला सरपंच छाया जंगम, उपसरपंच सोनाली सूर, तंटामुक्ती अध्यक्ष हॅनसन राव, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी, गावातील गणमान्य व्यक्ती यांच्यासह गावकरी व पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रवाश्यांचा प्रवास सुरक्षित व सोयीस्कर होईल अनेक वर्षानंतर माजरी गावातील एकमेव रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यात आले. या रस्त्यावर संबंधित विभागाने शायनींग बोर्ड व वाहतूक चिन्हे लावल्यास जी प्रवाश्यांना अपेक्षित परिस्थिती दर्शवू शकतात. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचा प्रवास सुरक्षित व सोयीस्कर होईल. अमितकुमार पांडेय, ठाणेदार माजरी


