Home चंद्रपुर जिल्हा विशेष चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक भरतीतील गैरव्यवहार थांबवा – मुकेश जीवतोडे

चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक भरतीतील गैरव्यवहार थांबवा – मुकेश जीवतोडे

1213

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 360 पदांच्या भरती प्रक्रियेत होत असलेल्या गंभीर गैरव्यवहारावर जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी आवाज उठवला आहे. चुकीच्या एजन्सीमार्फत परीक्षा घेतल्याने भ्रष्टाचार, आरक्षणाची पायमल्ली, आणि परीक्षार्थींच्या फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया तातडीने थांबवून न्यायालयाच्या आदेशानुसार पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी मुकेश जीवतोडे यांनी केली आहे.

.      भरती प्रक्रियेसाठी जवळपास 31,000 उमेदवारांनी अर्ज केले असताना, 21 डिसेंबर रोजी शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेत मोठा गोंधळ झाला. यामुळे परीक्षार्थींनी आंदोलन छेडले, आणि परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर 22 डिसेंबर रोजी लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतही तांत्रिक अडथळे आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे परीक्षार्थींमध्ये संतापाची लाट उसळली.

.      या भरती प्रक्रियेत 25 ते 35 लाख रुपयांच्या लाचखोरीचे आरोप झाले असून, फक्त पैसे देणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे प्रकार घडत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाचा बळी घेतल्याने मागासवर्गीय परीक्षार्थींच्या हक्कावर अन्याय झाला आहे.त्यामुळे या भरती प्रक्रियेची सीआयडीमार्फत तातडीने चौकशी करण्यात यावी.तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. आरक्षणाच्या नियमांचे काटेकोर पालन करून नव्याने भरती प्रक्रिया राबवावी. व भरती प्रक्रिया टीसीएस सारख्या विश्वासार्ह कंपनीमार्फत पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व शासनाला केली आहे. जर प्रशासनाने गैरव्यवहार थांबवून पारदर्शक भरती प्रक्रिया राबवली नाही, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी दिला आहे.

.      चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो तरुण आणि परीक्षार्थी या निर्णयाकडे आशेने पाहत आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन होऊन योग्य आणि पारदर्शक भरती प्रक्रिया राबवली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!