Home चंद्रपुर जिल्हा विशेष प्रदूषण लॉयड्सचे, खापर घुग्घुसवासींवर

प्रदूषण लॉयड्सचे, खापर घुग्घुसवासींवर

1261

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब-गजब कारभार

चंद्रपूर : केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी घुग्घुस येथील लॉयड मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमिटेडच्या प्रस्तावित विस्तारीकरणासंदर्भात पर्यावरण विषयक अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि वनविभागाला दिले. मात्र, चंद्रपुरातील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी घुग्घुस येथील प्रदूषणासाठी चक्क नगर परिषदेला जबाबदार धरले आहे. जखम डोक्याला आणि पट्टी पायाला बांधण्याचा हा प्रकार आता यादव यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यादव यांनीच काही महिन्यांपूर्वी लॉयड्स मेटलला प्रदूषणासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजाविली होती.

.        सप्टेंबर महिन्यात लॅायड्स मेटल्सच्या प्रस्तावित विस्तारीकरणासंदर्भात पर्यावरणविषयक जनुसनावणी झाली. या जनसुनावणीत पर्यावरणवाद्यांनी प्रदूषणाचे खापर विद्यमान प्रकल्पावर फोडले. विस्तारीकरण झाल्यास घुग्घुवासींचे जगणे कठीण होईल, याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष वेधले. दरम्यान या प्रस्तावित प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्यापूर्वी पर्यावरण विषयक बाबींची चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र स्वराज्य रक्षक समाजिक संस्थेचे अध्यक्ष मनोज पोतराजे यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांना पाठविले.

.     या पत्राची दखल घेत यादव यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उपसंचालक वनविभाग, नागपूर यांना यासंदर्भात तातडीने चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर कार्यालयाने उडी घेतली. त्यांनी पोतराजे यांना केंद्रीय प्रदूषण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रावर उत्तर २९ नोव्हेंबर २०२४ ला दिले. त्यात त्यांनी आणखी एक सहपत्र जोडले. ते सहपत्र घुग्घुस नगर परिषदेला ५ मार्च २०२४ रोजी यादव यांनी पाठविले होते.

.      या पत्रात घुग्गुस येथे मोकळ्या जागेत घरगुती वापराचा कोळसा जाळला जातो. रस्त्यांच्या अनियमित साफसफाईमुळे धुळ साचली आहे. त्यामुळे प्रदूषणात भर पडली आहे. उल्लेखनीय म्हणजे, घुग्घुस येथील प्रत्येक कुटुंबाकडे आता जवळपास गॅस सिलिंडर आहे. मग प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कोळसा जाळताना दिसला कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात आम्ही २०२४ मध्ये सर्वेक्षण केले होते, असा दावाही यादव यांनी या पत्रात केला आहे. विशेष म्हणेज एका महिन्यानंतरच २६ जून २०२४ ला लॉयड् मेट्लसला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस पाठविली. तत्पूर्वी, त्यांनी या लॉयड् मेटल्सची तपासणी केली होती. त्यात अनेक गंभीर बाबी समोर आल्या.

.      टायर धुण्याच्या प्रक्रियेमुळे तयार होणाऱ्या सांडपाण्यासाठी पुनर्वापर टाकी उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. अशुद्ध सांडपाणी थेट उद्योगाच्या सीमाभिंतीजवळ सोडले जात आहे. कच्चा माल उघड्या जागेत साठवण्यात आला होता. त्यावर पाण्याचा फवारा मारण्यासाठी कोणत्याही यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली नव्हती. प्रकल्पातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी धुळीचा थर दिसून आला आहे. कच्चा माल हाताळणी क्षेत्राजवळ धूर आणि धुळीचे उत्सर्जन होत असल्याचे आढळले. वीज निर्मिती प्रकल्पातील सांडपाणी थेट कारखान्याच्या परिसरात असलेल्या कच्च्या तळ्यात कोणत्याही उपचाराशिवाय सोडण्यात येत आहे. गृहोपयोगी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्थापित करण्यात आलेली सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा (STP) कार्यरत स्थितीत आढळली नाही. एवढ्या गंभीर बाबींची नोंद कारणे दाखवा नोटीसमध्ये यादव यांनी घेतली आहे. मात्र, केंद्रीय मंत्र्यांच्या पत्रावर उत्तर देताना चक्क त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि प्रदूषणाला घुग्घुस नगर परिषदेला जबाबदार धरले. यांसदर्भात यादव यांची प्रतिक्रिया उपलब्ध होवू शकली नाही.

केंद्रीय पर्यावरणा मंत्र्यांनी माझ्या पत्राची दखल घेत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्थानिक अधिकारी चक्क पर्यावरण मंत्र्यांची दिशाभूल करीत आहे. प्रदूषणाल घुग्घुस नगर परिषदेला जबाबदार धरण्यात आले. ही गंभीर बाब आहे.                                                                                                                                                             मनोज पोतराजे,                                                  अध्यक्ष, स्वराज्य रक्षक सामाजिक संस्था, चंद्रपूर

error: Content is protected !!