वासेरा – गडबोरी मार्गावर गिट्टीचे ढिगारे
महेंद्र कोवले
सिंदेवाही : राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असून नुकताच निकाल जाहीर झाला आहे. निवडणुकांच्या काळात गावागावात प्रचारासाठी राजकीय नेते येतील. या कारणाने वासेरा – गडबोरी मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकलेले गिट्टीचे ढिगारे अजूनही जसेच्या तसेच आहेत. आता निवडणुका संपल्या आतातरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करा. अशी आर्त हाक या परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांचेकडे केली आहे.
. मागील पाच वर्षात सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची पूर्णतः चाळणी झाली आहे. लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागातील रस्त्याकडे कोणतेच लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यातच राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. आणि प्रचारासाठी राजकीय पक्षांचे नेते मंडळी गावागावात येतील. तेव्हा आपल्या कार्यालयाची कमीपणा होईल, किंवा लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी गिट्टीचे ढिगारे टाकून ठेवण्यात आले आहेत.
. मात्र प्रत्यक्षात अजूनही कोणत्याच कामाला सुरुवात झाली नाही. आता निवडणुका संपल्या, निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून राज्यात महायुतीला निर्विवाद बहुमत प्राप्त झाले आहे. परंतु राज्यात अजूनही सरकार स्थापन झाले नाही. सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाने सरकार स्थापन होण्याची कोणतीही वाट न बघता वासेरा – गडबोरी मार्गावरील खड्डे बुजवून मार्ग खड्डे मुक्त करावा. अशी मागणी आता या भागातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. तसेच तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात सुद्धा ठिकठिकाणी गिट्टीचे ढिगारे टाकलेले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा प्रत्यक्षात कामाला सुरुवात करून मार्ग सुरळीत करून द्यावा. अशी मागणी प्रवाश्यांकडून होत आहे.


