दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
95 उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद
चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६४.४८ टक्के मतदान झाले. चिमूरमध्ये सर्वाधिक ७४.८२ टक्के तर चंद्रपूरमध्ये सर्वात कमी ५३.५७ टक्के मतदान झाले. चिमूर व मुल येथे भाजप व काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. तर भद्रावतीत एका महिलेने ईव्हीएम मशीन फोडल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती.
. चंद्रपूरमध्ये २९.३ टक्के, बल्लारपूरमध्ये ३५.४१ टक्के, ब्रह्मपुरीमध्ये ३९.९१ टक्के, चिमुरमध्ये ४१.०४ टक्के मतदान झाले आहे. वरोरा मतदारसंघात ३२.२४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर पुन्हा मतदानाचा वेग मंदावला. मात्र सायंकाळी चार वाजतानंतर पुन्हा मतदार घराबाहेर पडले त्यामुळे मतदान केंद्रावर गर्दी बघायला मिळाली. शहराच्या मध्यवर्ती भागापेक्षा झोपडपट्टी व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर अधिक गर्दी होती. त्याचा परिणाम सायंकाळी पाच वाजतापर्यंत राजुरा मतदारसंघात ६५.५९ टक्के मतदान झाले. चंद्रपूरमध्ये ५३.६७ टक्के, बल्लारपूर ६३.४४ टक्के, ब्रह्मपुरी ७२.९७ टक्के, चिमुरमध्ये ७४.८२ टक्के तर वरोरा मतदारसंघात ६०.२१ टक्के मतदान झाले आहे. पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व कुटुंबियांनी सकाळी ११ वाजता चंद्रपुरातील सिटी शाळेत मतदान केले.
. काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांनी मूल येथे मतदान केले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी येथे, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा तर राजुराचे काँग्रेस उमेदवार आमदार सुभाष धोटे, शेतकरी संघटनेचे माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी राजुरा येथे मतदान केले. भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरात मतदान केले. जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा परिषद सीईओ विवेक जॉन्सन यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात एकूण 5 लक्ष 92 हजार 667 पुरुष मतदारांनी, 6 लक्ष 266 स्त्री मतदारांनी आणि 6 इतर मतदारांनी अशा एकूण 11 लक्ष 92 हजार 939 मतदारांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केले. जिल्ह्याची मतदानाची सरासरी टक्केवारी 64.48 आहे.
तणावामुळे पोलिस बंदोबस्त मुल येथे काँग्रेस उमेदवार दारू व पैसे वाटप करीत असल्याची तक्रार सपना मुनगंटीवार यांनी केल्याने तणाव निर्माण झाला होता. येथे काँग्रेसचे विजय चिमद्यालवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुल येथे तणावामुळे पोलिस बंदोबस्त वाढविल्याने छावणीचे स्वरूप आले होते. तर चिमूर येथेही भाजप व काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता.
असे झाले मतदान राजुरा विधानसभा 65.59 टक्के 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1 लक्ष 7 हजार 344 पुरुष मतदार, 1 लक्ष 6 हजार 12 स्त्री मतदार व 2 इतर मतदार अशा एकूण 2 लक्ष 13 हजार 358 मतदारांनी (65.59 टक्के) मतदानाचा हक्क बजावला.
चंद्रपूर विधानसभा 53.57 टक्के 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 2 हजार 296 पुरुष मतदार, 98 हजार 4 स्त्री मतदार अशा एकूण 2 लक्ष 300 मतदारांनी (53.57 टक्के) मतदान केले.
बल्लारपूर विधानसभा 63.44 टक्के 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 98 हजार 179 पुरुष मतदार, 99 हजार 989 स्त्री मतदार व 3 इतर मतदार अशा एकूण 1 लक्ष 98 हजार 171 मतदारांनी (63.44 टक्के) मतदान केले.
ब्रम्हपुरी विधानसभा 72.97 टक्के 73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 97 हजार 592 पुरुष मतदार, 1 लक्ष 3 हजार 573 स्त्री मतदार अशा एकूण 2 लक्ष 1 हजार 165 मतदारांनी (72.97 टक्के) मतदान केले.
चिमूर विधानसभा 74.82 टक्के 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 2 हजार 431 पुरुष मतदार, 1 लक्ष 7 हजार 697 स्त्री अशा एकूण 2 लक्ष 10 हजार 128 मतदारांनी (74.82 टक्के) मतदान केले.
वरोरा विधानसभा 60.21 टक्के 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात 84 हजार 825 पुरुष मतदार, 84 हजार 991 स्त्री मतदार व 1 इतर मतदार अशा एकूण 1 लक्ष 69 हजार 817 मतदारांनी (60.21 टक्के) सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला.


