Home राजकीय महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारात काट्याची टक्कर

महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारात काट्याची टक्कर

1293

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात लक्षवेधी लढत

तीन लक्ष ११ हजार मतदार करणार फैसला

बल्लारपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २0 नोव्हेंबर रोजी होऊ घातली आहे. अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. बल्लारपूर विधानसभा मतदार संघात 3६६ मतदान केंद्राच्या माध्यमातून 3 लक्ष ११ हजार ९४ मतदार मताधिकार बजावणार आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असून दोन मतदान मशीन च्या माध्यमातून मतदार पसंतीच्या उमेदवाराच्या निवडीवर शिक्कामोर्तब करणार आहे.मुख्य लढत महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांत होण्याची शक्यता आहे. यामुळे बल्लारपूर विधानसभा मतदार संघाची निवडणूक लक्षवेधी होत आहे.

.       बल्लारपूर विधानसभा मतदार संघ अस्तित्वात आले.तेव्हापासून यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही संख्या तब्बल २0 आहे. मात्र, येथे मुख्य लढत महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार व महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंग रावत यांच्यात काट्याची टक्कर दिसून येत आहे. ही लढत तिहेरी करण्याचा प्रयत्न अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे (बेहरे) करत आहे. या विधानसभा मतदार संघात २00९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. त्यावेळी निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांनी कांग्रेसचे उमेदवार राहूल पुगलिया यांचा पराभव करून पहिल्यांदा विजयाची मुहूर्तमेढ रोवली.

.       बल्लारपूर विधानसभा मतदार संघात २0१४ च्या निवडणुकीत एकूण १६ निवडणूक रिंगणात होते. यावेळी भाजप व कांग्रेस पार्टी मध्ये दुहेरी लढत झाली होती.या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी ५3 टक्के मते घेत कांग्रेसचे उमेदवार घनश्याम मुलचंदानी यांचेवर मात केली होती. सन २0१९ च्या विधानसभा निवडणूक बल्लारपूर विधानसभेत पहिल्यांदा तिहेरी झाली. भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची मते यावेळी घटली.त्यांना ४२ टक्के मते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी कांग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वास झाडे यांना २६ टक्के, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजू झोडे यांना २0 टक्के मतदानावर समाधान मानावे लागले होते.

.       यंदाची विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अटीतटीच्या सावटात अडकली आहे. भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार व कांग्रेसचे उमेदवार संतोष सिंग रावत यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. या तुल्यबळ लढतीत आपण बाजी मारणार असा आशावाद अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे (बेहरे) यांना वाटत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश मालेकर मागील निवडणुकीत मिळालेली मते आताही मिळतील, या आशेवर आहे. मात्र मतदार राजा प्रगल्भ झाला आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात परिवर्तन घडविण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येत आहे. मतदारांचा कौल कोणत्या उमेदवाराला ते 23 नोव्हेंबर रोजी कळणार आहे.

error: Content is protected !!