महेंद्र कोवले
सिंदेवाही : राज्यातील २८८ विधानसभा सदस्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. अनेक राजकीय पक्षांनी आणि अपक्षांनी निवडणुकीत उडी घेतली आहे. यावर्षी होणारी निवडणूक ही अनेक ठिकाणी जातीचा फॅक्टर चालवून उमेदवार दिले असल्याने अनेक राजकीय पक्षांनी जातीय समीकरण जुळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदार कुणबी समाजाचे असून त्या खालोखाल बौद्ध समाजाचे मतदार आहेत. ब्रम्हपुरी क्षेत्रातील कुणबी समाज एकवटला असून भाजपचे उमेदवार कृष्णालाल सहारे हे कुणबी असल्याने कुणबी फॅक्टर चालल्यास त्याचा फायदा भाजपला होऊन क्षेत्रात परिवर्तन होणार असल्याची मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
. ब्रम्हपुरी मतदार संघात मागील 10 वर्षापासून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार हे या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. वडेट्टीवार यांनी विकासाच्या बाता मारून पुन्हा तिसऱ्यांदा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढवीत आहेत. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात अंदाजे ६० हजाराचे वर कुणबी समाजाचे मतदार असून त्या खालोखाल ४५ हजाराचे वर बौद्ध समाजाचे मतदार आहेत. क्षेत्रातील संख्येने दुसऱ्या नंबरवर असलेल्या बौद्ध समाजाने सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. राहुल मेश्राम यांचे रूपाने एक दूरदृष्टीचा, कार्यतत्पर, आणि आश्वासक चेहरा म्हणून उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे यावेळी बौद्ध मतदार पूर्णपणे जातीचा फॅक्टर चालवून डॉ. राहुल मेश्राम यांचे सोबत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर मतदार संघात सर्वाधिक मतदार असलेल्या कुणबी समाजाकडून क्षेत्रामध्ये तीन ते चार उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. क्षेत्रात सध्या कांग्रेस – भाजप मध्ये थेट लढत असल्याने कुणबी समाज हा भाजप उमेदवार कृष्णालाल सहारे यांचे बाजूने एकवटला असल्याचे चित्र निर्माण झाले असून त्यामुळे यावेळी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात नक्कीच परिवर्तन होणार. असे सर्वत्र बोलल्या जात आहे.
. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ब्रम्हपुरी येथील कुणबी मेळाव्यात जाहीर केले होते की, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात अल्पसंख्यांक समाजाला थारा न देता मोठ्या प्रमाणात असलेल्या कुणबी समाजाला आमदार करा. असे आवाहन करून एक प्रकारे विजय वडेट्टीवार यांचेवर त्यांनी निशाणा साधला होता. खासदार धानोरकर यांचे आवाहनाला प्रतिसाद देत कुणबी समाज एकवटला असल्याचे बोलल्या जात आहे. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात जेव्हा जेव्हा कुणबी फॅक्टर एकवटला तेव्हा तेव्हा या क्षेत्रात बाबा खानोरकर, उद्धवराव शिंगाडे यांचे रूपाने कुणबी आमदार झाले आहेत. पुन्हा एकदा कुणबी समाज एकवटला असून समाजाच्या उमेदवारासोबत भक्कमपणे उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे “कुणबी फॅक्टर” चालल्यास भाजपचे उमेदवार कृष्णालाल सहारे यांना त्याचा फायदा होऊन ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात नक्कीच परिवर्तन होणार? अशी चर्चा जागरूक मतदार करीत आहेत.


