माजी मंत्री बच्चू कडू यांचे मतदारांना आवाहन
वरोरा : काँग्रेस आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सन २००४ मध्ये शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी काँग्रेसने स्वामीनाथन आयोग आणला व २००६ मध्ये तो स्वीकारला. परंतु त्यात ५० टक्के नफा गृहीत धरून शेतमालाला भाव देण्याची शिफारस असल्याने तो काँग्रेसने तसाच ठेवला. तर दुसरीकडे कृषी मूल्य आयोगाने सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याची शिफारस केली असताना भाजपाने केवळ ४८०० रुपये हमीभाव दिला. हे पाहता काँग्रेस आणि भाजपा शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांचे कधीही भले करू शकत नाही .त्यामुळे या सर्वांच्या हितासाठी परिवर्तन आघाडी कडून उभे असलेले प्रहारचे अहेतेशाम अली यांना भरघोस मतांने विजयी करा असे आवाहन माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मतदारांना केले. ते ११ नोव्हेंबर रोजी वरोरा विधानसभा क्षेत्रातून उभे असलेले उमेदवार अहेतेशाम अली यांच्या प्रचाराकरिता आयोजित भद्रावती येथील शिंदे सभागृहाच्या प्रांगणात आयोजित सभेमध्ये बोलत होते.
. पुढे बोलताना त्यांनी वन्य प्राण्यांच्या हौदसामुळे होत असलेल्या शेत पिकाच्या नुकसानीच्या मुद्द्याला हात घातला. शेतकरी, शेतमजूर मेला तरी चालेल परंतु वाघ वाचला पाहिजे, शासनाचे हे धोरण चुकीचे असल्याचे ते म्हणाले. तसेच साप चावून शेतकरी, शेतमजुराचा मृत्यू झाल्यावर कोणतिही आर्थिक मदत शासन देत नाही. यावर त्यांनी टीका करताना साप हा वन्यप्राणी नाही का असा प्रश्नही केला. आपले सरकार आल्यास आपण शेतकरी, शेतमजूर आणि कामगार यांच्या विरोधातील अशा प्रकारच्या कायद्यात बदल करू असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित त्यांना दिला. सदर प्रचार सभेवेळी
व्यासपीठावर उमेदवार अहेतेश्याम अली, शेतकरी संघटनेचे विदर्भवादी नेते ॲड. वामनराव चटप, धर्मेंद्र हवेलीकर, शरद कारेकर, सतीश बिडकर, रवी पवार, दादा झाडे, तुळशीराम श्रीरामे ,भास्कर तुमराम, अमोल काटकर, शाहिद अली, चंद्रकला मत्ते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
. वरोरा शहराच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत आपण वरोरा शहराचा चांगला विकास केला. जात-पात न पाहता अडीअडचण घेऊन येणाऱ्या गोरगरिबांना सर्वधर्म समभाव जोपासून यथाशक्ती मदत केली. मंदिर तसेच विविध सामाजिक संघटनेला समाजभावनाकरिता जागा दान दिली.माझा पिंड हा समाजसेवेचा असून या सेवेला पदाची जोड मिळण्यासाठी आपण मला साथ द्यावी, तुमची साथ लाभल्यास क्षेत्राचा अपेक्षित विकास, बेरोजगारांच्या हाताला काम देता येईल असे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अहेतेशाम अली यांनी म्हटले. तसेच स्थानिक कामगारांना डावलून परप्रांतीय कामगारांची भरती करणाऱ्या कंपन्यांना आपण त्यांची जागा दाखवू असा विश्वास त्यांनी याप्रसंगी उपस्थितांना दिला. आ. बच्चू कडू यांचे भद्रावती शहरात आगमन होताच सर्वप्रथम त्यांची ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत शहरातील प्रमुख रस्त्यावरून रैली काढण्यात आली होती. सभेला मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.


