चिमूर बस आगारामधील घटना
नेरी : चिमूर एसटी बस स्थानकात बसमध्ये चढत असताना उमरेड येथील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यानी हिसकावले. याप्रकरणी चिमूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. उमरेड जिल्हा नागपूर येथील रजनीहर हरियर वैद्य (३६) ह्या आपल्या मुलांसोबत माहेरी नेरी येथे आपल्या भावाला ओवाळणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यांचा चिमूर येथे एक भाऊ राहत असल्याने सकाळीच बसने चिमूर येथे आल्या होत्या. भावाला ओवाळणी करून दुपारी १.३० वाजता मुलांसोबत नेरीला जाण्यासाठी एसटी स्टँडवर आल्या. नेरी येथे जाणाऱ्या बसमध्ये बस क्र एमएच-07-सी 9528 चढत असताना प्रवाशांची गर्दी होती. गर्दी असताना मागे सरकल्यानंतर गळ्याला हात लाहून बघितले असता त्यांना या वेळी गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र नसल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी त्यांनी चिमुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम पुढील तपास करीत आहेत.
. दरम्यान,बस स्थानकात एसटी बसमध्ये चढताना अनेक महिलांचे दागिने चोरीला गेलेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.


