बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील तुकडोजी महाराज चौकात एका शेतकऱ्याची गाय अज्ञात आरोपींनी वाहनात कोंबून लंपास केल्याची घटना घडली होती. हा प्रकार एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. या प्रकरणी शेतकऱ्याने बल्लारपूर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. याचा छडा पोलिसांना लावण्यात यश आले. विसापुरातील जनावरे चोरणारी टोळी गजाआड करून आरोपीकडून २ लक्ष ४६ हजाराचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
. जनावरे चोरणारी टोळीतील आरोपींचे एजाज बेग अस्लम कुरेशी (36), वसीम कुरेशी नबी कुरेशी (36) दोन्ही रा.नुरी चौक, बगड खिडकी चंद्रपूर, मोहम्मद फैज अब्दुल रशीद (२२) रा. कसाबपुरा मरकस मस्जिद जवळ चांदूरबाजार जि. अमरावती आणि अब्दुल इसरार कुरेशी अब्दुल जलील कुरेशी (२६) रा. जिलानी नगर, दादमहल वार्ड चंद्रपूर असे नाव आहे. या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील मनोहर बापुराव गिरडकर (४५) यांची पांढऱ्या रंगाची गाय चोरीला गेली होती. याची तक्रार मनोहर गिरडकर यांनी 31 आक्टोंबर २0२४ रोजी बल्लारपूर पोलिस ठाण्यात दाखल केली. हा घटनाक्रम विसापूर येथील एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. आरोपींनी एका वाहनातून गाय पळवल्याची घटना घडल्यामुळे गावातील दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी धास्तावले होते.
. बल्लारपूर पोलिसांनी तक्रार दाखल होताच तपासाची चक्रे गतीने फिरवली. दोन दिवसात विसापुरातील जनावरे चोरणारी टोळी गजाआड करून यशस्वी कामगिरी बजावून आरोपीकडून २ लक्ष ४६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.यामध्ये एक जुन्या वापरातील टाटा व्हिस्टा वाहन क्रमांक ( एम.एच.४९ / बी – ५3६3 ),जुन्या वापरातील टाटा इंडिका वाहन क्रमांक ( एम.एच. 3४ / के. ५८९४ ) ही दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे.


