दैनिक “नवजीवन” चे भाकीत खरे ठरले
वरोरा विधानसभा 2024
रवी खाडे
चंद्रपुर : कुठल्याही परिस्थितीत आमदार बनायच ही भावना उराशी बाळगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपमय झालेले रमेश राजुरकर यांना वरोरा विधानसभा मतदार संघाची उमदेवरी नाकारत माजी पालकमंत्री स्वर्गीय संजय देवतळे यांचे सुपुत्र करण देवतळे यांना उमेदवारी जाहीर केल्याने अखेर रमेश राजुरकर यांचा भाजपा प्रवेश नडला आहे. या संदर्भात दैनिक नवजीवनने याआधीच भाकीत केलेले होते हे विशेष.
![]()
खर्या अर्थाने राजकीय आत्महत्या ?
वरोरा शहरातील उद्योजक म्हणून ओळख असलेले रमेश राजुरकर यांनी 2019 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत येत राजकरणात उडी घेतली.
वरोरा विधानसभेच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत वरोरा मतदार संघासाठी रमेश राजुरकर यांनी उमेदवारी देण्याचा पक्ष श्रेष्ठी कडे आग्रह केला. त्यानुसार वरोरा विधानसभेची उमेदवारी रमेश राजुरकरांना मिळाली. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना 63 हजार 862 मते मिळाली. शिवसेनेचे संजय देवतळे यांना 53 हजार 665 मते मिळाली. तर पाहिल्याच प्रयत्नात मनसेचे रमेश राजुरकर यांना 34 हजार 848 मते मिळाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या घरी भेट देत राजकीय चर्चा केली. त्यानंतर राजुरकरांनी मनसेची साथ सोडत भाजपचे कमळ फुलवले. रमेश राजुरकर यांनी मनसेला रामराम ठोकताच व भाजप मध्ये प्रवेश घेण्याचे संकेत लागताच दैनिक नवजीवन ने “मनसेचे रमेश राजुरकर यांचा भाजप प्रवेश म्हणजे राजकीय आत्महत्याच ? ” या मथळ्याखाली राजकीय विश्लेषण प्रकाशित करीत भाकीत दिले होते. ते आज रमेश राजुरकरांची दावेदारी नाकारत माजी पालकमंत्री संजय देवतळे यांचे सुपुत्र करण देवतळे यांना देण्यात आल्याने राजुरकरांची खर्या अर्थाने राजकीय आत्महत्या ? झाल्याचे बोलल्या जात आहे.
. रमेश राजुरकर यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी भाजप पक्षासाठी व भाजप पक्ष वाढीसाठी दिवसरात्र मेहनत घेतली. त्यांनी स्वता:च्या उद्योगाकडे दुर्लक्ष करीत कार्यकर्त्यांशी फळी निर्माण केली. 2024 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत वरोरा मतदार संघातून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा दावा केला होता. त्या नुसार राजुरकरांचे मोठ्या प्रमाणात प्रयत्नही सुरू होते. त्यांनी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र पिंजुन काढले. मात्र ही जागा शिवसेना शिंदे गटाला जाणार असल्याची चर्चा त्यांच्या कानावर येताच त्यांनी कार्यकर्त्यांना घेऊन नागपूर येथील भाजप कार्यालय गाठत उमेदवारीसाठी निदर्शने दिली. त्यानंतर मुंबई गाठत वरिष्ठांशी मनधरणी केली. इतक्या प्रयत्नांनंतरही भाजपने त्यांच्या हाती तुरी दिल्या. यामुळे वरोरा विधानसभा क्षेत्रात भाजपचे कार्यकत्यात नाराजीची लाट पसरली आहे.
भाजपातील इच्छुकांच्या आनंदावर विरजण
वरोरा विधानसभा क्षेत्राची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला जाणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात घुंगावत होती. त्यामुळे काही काळ भाजप मधील इच्छुकांमध्ये नाराजीचा सुर पसरला होता. भाजपला जागा मिळाली नाही.
तर बंडखोरी करणार अशी चर्चा काही इच्छुकांनी बोलून दाखविली. मात्र अचानक ही जागा भाजपालाच मिळणार असे संकेत सुरू झाले. त्यामुळे भाजप मधील इच्छुकांच्या भुवया उंचावल्या आणि उमदेवारीसाठी दावेदारी करणारे रमेश राजुरकर, वारी प्रबोधनाची राबवत वरोरा भद्रावती पिंजुन काढणारे नरेंद्र जिवतोडे, ओम मांडवकर, सिनेट सदस्य डॉ. सागर वझे, किशोर टोंगे आणि शालेय जीवनापासून भाजप मध्ये कार्यरत असलेले युवकांचे युवा नेतृत्व सिनेट सदस्य वामन तुर्के हे सर्व सक्रिय झाले. परंतु या सर्वांना डावलून भाजपाने माजी पालकमंत्री संजय देवतळे यांचे सुपुत्र करण देवतळे यांच्यावर विश्वास दाखवीत त्यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपातील इच्छुकांच्या आनंदात विरजण पडले.
. करण देवतळे यांचे वय आणि त्यांचे पक्षातील कार्य पहाता इच्छुक उमेदवारांसह सर्वच पदाधिकारी संभ्रमात पडले आहे. इतर पक्षातील किंवा अपक्ष उमेदवारला विजय करण्यासाठी असा नवखा उमेदवार भाजपने दिला तर नाहीना अशी शंका यामुळे निर्माण होत आहे. तसेच डॉ. विजय देवतळे यांचे वडील दादासाहेब देवतळे यांच्या पुण्याईने संजय देवतळे यांचे राजकीय अस्थित्व स्थिरावले. परंतु संजय देवतळे किंवा त्यांच्या नंतर परिवाराने डॉ. विजय देवतळे यांच्या राजकीय अस्थित्वाचा विचार न केल्याने डॉ. विजय देवतळे आणि डॉ. आसावरी देवतळे काय भूमिका घेतात यावर करण देवतळे यांचे राजकीय भविष्य अवलंबून राहणार आहे. तसेच भाजपातील इच्छुक सर्व उमेदवारांपेक्षा करण देवतळे वयाने अतिशय लहान आहे. ते राजकीय दृष्ठा अपरिपक्व आहे. तेव्हा त्यांना त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असणारे इच्छुक उमेवार आणि पदाधिकारी साथ देतील का असा प्रश्न आहे.
भाजपला रामराम ठोकला ![]()
कट्टर संजय देवतळे समर्थक अहेतेशाम अली यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकत प्रहार संघटने कडून उमेदवारी मिळवली असल्यामुळे ते 100 टक्के बंडखोरी करतील असे स्पष्ट आहे. वरोरा मतदार संघासाठी इच्छुक असलेले इच्छुक पक्षाने घेतलेला निर्णय मान्य करून करण देवतळे यांना साथ देतील की बंडखोरी करतील याकडे वरोरा मतदार संघातील मतदारांचे लक्ष लागले आहेत.


