Home चंद्रपुर जिल्हा विशेष बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आल्यापासून भाजपाचे वर्चस्व !

बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आल्यापासून भाजपाचे वर्चस्व !

1310

२0१४ ची निवडणूक सर्वच पक्षांनी लढली

कांग्रेस पक्षाला मानावे लागले दुसऱ्याच क्रमांकावर समाधान

विसापूर : महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती नंतर येत्या २0 नोव्हेंबर रोजी १५ व्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मतदार संघाच्या पुनर्रचना पूर्वी बल्लारपूर विधानसभा क्षेत्र चंद्रपूर व सावली मतदार संघात समाविष्ट होता. मात्र, सन २00९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीपासून बल्लारपूर विधानसभा अस्तित्वात आहे. तेव्हापासून या विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे. यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रावर भाजपाचे वर्चस्व आहे. विशेष म्हणजे आताच्या निवडणुकीतील महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांनी २0१४ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आपपल्या चिन्हावर लढली होती.

.       बल्लारपूर विधानसभा क्षेत्र २00९ मध्ये अस्तित्वात आले. या मतदार संघात बल्लारपूर, पोंभुर्णा व मूल तालुक्याचा समावेश असून चंद्रपूर ग्रामीण महसूल मंडळ व रय्यतवारी महसूल मंडळ समाविष्ट केले आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात आजतागायत तीनदा विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली. यामध्ये भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी सलग विजय मिळवला आहे. या तिन्ही निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी त्यांचेशी लढत दिली आहे.आता देखील चौथ्यांदा तेच भाजपाकडून किल्ला लढवत आहे.

.       बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचा मागोवा घेतला असता २00९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत केवळ ८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. या निवडणुकीत एकूण मतदारांपैकी १ लक्ष ७3 हजार २७९ मतदारांनी मताधिकार बजावला होता. याची टक्केवारी ६१.१3 इतकी होती. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना ८६ हजार १९६ मते मिळाली होती. ही टक्केवारी ४९.७४ इतकी होती. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून कांग्रेस पक्षाचे राहूल पुगलिया ठरले. त्यांना एकूण मतांपैकी ६१ हजार ४६0 मते मिळाली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी 35.47 इतकी होती. या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार विनोद अहिरकर यांना १0 हजार ९२१, तर बसपाचे उमेदवार डॉ. अमल पोतदार यांना १0 हजार २४५ मते मिळाली होती. ही निवडणूक सुधीर मुनगंटीवार यांनी २४ हजार ७3६ मतांच्या फरकाने जिंकली होती.

.       बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील २0१४ ची सार्वत्रिक निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी लढवली. यावेळी मतदार संघातील एकूण मतदारांपैकी १ लक्ष ९५ हजार ६0१ मतदारांनी मताधिकार बजावला. ही मतांची टक्केवारी ६3.६२ इतकी होती. या निवडणुकीत एकूण १६ उमेदवारांपैकी भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांना १ लक्ष 3 हजार ७१८ मते मिळाली. त्यांच्या मतांची टक्केवारी 53.03 इतकी होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार घनश्याम मुलचंदानी यांना ६0 हजार ११८ मते मिळाली होती. ही टक्केवारी 30.74 इतकी होती. यामध्ये बसपाचे उमेदवार राजेश सिंग यांना १0 हजार 3४४ मते प्राप्त झाली होती. गोंडवाना गणतंत्र पक्षाचे मनोज आत्राम, शिवसेनाचे केशव कटरे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हर्षल चिपळूणकर, राष्ट्रवादी काँग्रेस चे वामन झाडे,सिपीआय चे प्रा.रमेशचंद्र दहिवडे या उमेदवारांनी देखील चार आकडी मतदान पदरात पाडून घेतले होते. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी कांग्रेस पक्षाच्या उमेदवारास 43 हजार 600 मतांच्या फरकाने धूळ चारली होती.

.       २0१९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत १४ उमेदवारांनी नशिब आजमावले. ही निवडणूक भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना काहिसी कठीण गेली.या निवडणुकीत त्यांना एकूण झालेल्या २ लक्ष ४६0 मतदानांपैकी ८६ हजार २ मते मिळाली. कांग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. विश्वास झाडे यांना ५२ हजार ७६२ मते, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजू झोडे यांना 39 हजार ९५८ मते आणि गोंडवाना गणतंत्र पक्षाचे उमेदवार मनोज आत्राम यास 13 हजार ९२५ मते मिळाल्याने भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. ही निवडणूक त्यांनी 33 हजार २४0 मताधिक्याने जिंकून वर्चस्व निर्माण केले.

यंदाची विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरणार                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  यावर्षीच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक भाजपा व कांग्रेस पक्ष एकजुटीने लढत आहे. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला आहे. परिणामी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीच्या माध्यमातून मतदारांना सामोरे जात आहे. सलग विधानसभा निवडणूक जिंकल्याचा आत्मविश्वास भाजपाचे म्हणजे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना आहे. मात्र, मागील निवडणुकीप्रमाणे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येत नाही. यामुळे बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील निवडणूक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!