मध्य रेल्वे प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष
मार्गादरम्यान पाणी व चिखलामुळे वाहतुकीला अडथळा
विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर सर्वात मोठे गाव आहे. गावाची लोकसंख्या १७ हजारांवर असून रेल्वे मार्गामुळे विभागले आहे. वर्धा ते बल्लारपूर दरम्यान चौथा रेल्वे मार्गाच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र, भूमिगत मार्गावरील पाणी आणि चिखलामुळे अडथळा निर्माण झाला आहे.मध्य रेल्वेच्या जाणिवपूर्वक दुर्लक्षामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामुळे विसापूरचा भूमिगत रेल्वे मार्ग नागरिकांना डोकेदुखीचा झाला आहे. यावर रेल्वे प्रशासनाने उपाययोजना करावी. अन्यथा नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती आहे.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाच्या मध्यभागातून तीन रेल्वे मार्ग गेली आहे. दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गावरील भूमिगत मार्गाचा पूल बांधण्यात आला. रेल्वे मार्गामुळे गाव विभागले आहे. यामुळे भूमिगत मार्गाचा नागरिकांना अवलंब करावा लागत आहे. याच भूमिगत मार्गातून गावाचे आवागमन होते. हाच एकमेव मार्ग वाहतुकीचे साधन आहे. मात्र,रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे शालेय विद्यार्थ्यांना, वाहन चालकांना, पैदल ये – जा करणार्यांना, जनावरांना भूमिगत मार्गातील पाणी आणि चिखलाच्या साम्राज्याचा मोठा सामना करावा लागतो आहे.
. मागील पाच महिन्या पासून भूमिगत रेल्वे मार्गाची दुरावस्था झाली आहे. यामुळे हा मार्ग नागरिकांना डोकेदुखीचा झाला आहे. मात्र,मध्य रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या जीवावर उठले आहे. भूमिगत मार्गातील वीज व्यवस्था नाही. पाणी आणि चिखल तुडवित ये – जा करावी लागत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अद्याप भूमिगत रेल्वे सुरळीत चालू झाला नाही. परिणामी नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. नागरिकांच्या संयमाचा बांध केव्हाही सुटू शकतो. रेल्वे प्रशासनाने वळीच असंतोषाची दखल घेतली नाही. तर नागरिक रेल्वे मार्ग रोखून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याची माहिती आहे. रेल्वे प्रशासनाच्या कंत्राटदाराने विसापूर रेल्वे मार्गादरम्यान भूमिगत रेल्वे मार्ग तातडीने अद्यावत करून वाहतुकीसाठी सुलभ करून द्यावा, असी नागरिकांची मागणी आहे.
वंदेभारत रेल्वे मुळे रेल्वे रूळावरून आवागमन बंद विसापूर गावातील नागरिकांना वाहतुकीसाठी पूर्वी रेल्वे मार्गादरम्यान रेल्वेचे फाटक होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने भूमिगत रेल्वे मार्ग तयार केला. त्यामुळे जुने रेल्वे फाटक कायमचे बंद केले. तरीही नागरिक रेल्वे रूळावरून आवागमन करत होते. सप्टेंबर महिन्यात नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत रेल्वे सेवा सुरू केली. तेव्हापासून मध्य रेल्वे प्रशासनाने गावातील नागरिकांना रेल्वे रूळावरून आवागमन बंद केले. यामुळे गावातील नागरिकांना ये – जा करण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. भूमिगत रेल्वे मार्ग हाच एकमेव मार्ग आहे. यामध्ये देखील चिखलामुळे व भूमिगत रेल्वे मार्गात पाणी साचून राहत असल्यामुळे त्रासदायक ठरला आहे.
विसापूरच्या रेल्वे मार्गावर पादचारी पूल स्वप्नच विसापूर गावाची लोकसंख्या लक्षात घेता,नागरिकांना आवागमन करण्यासाठी पादचारी पूल आवश्यक आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विसापूर गावासाठी रेल्वे मार्ग दरम्यान पादचारी पूल मंजूर करण्यात आल्याचे पत्र समाज माध्यमातून राजकीय कार्यकर्ते सांगत आहे. हा केवळ आगामी विधानसभा निवडणुकीत मत पेरणीचा फंडा तर नाही ना! ही चर्चा जोर धरत आहे. रेल्वे मार्ग दरम्यान पादचारी पूल, हे विसापूरकरांसाठी स्वप्नच ठरणार काय, असा पश्न देखील नागरिकांत असंतोष निर्माण करत आहे.


