पती समोर पत्नीला वाघाने केले ठार
बल्लारपूर वन परीक्षेत्रातील घटना
विसापूर : बल्लारपूर शहरातील पंडित दिनदयाळ वार्डातील पती व पत्नी जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेले. त्यावेळी पती सरपण गोळा करत होता. नेमक्या त्याच वेळी दबा धरून असलेल्या वाघाने त्याचा पत्नीवर झडप टाकली. तिच्या गळ्याचा घोट घेऊन तिला फरपटत घेऊन गेला. यात ती ठार झाली. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव लालबच्ची राम अवध चौहान (६0 ) रा. पंडित दिनदयाळ वार्ड, बल्लारपूर असे आहे. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
. बल्लारपूर शहरालगत पंडित दीनदयाळ वार्ड जंगलाला लागून आहे. मागील काही दिवसापासून या भागात नागरिकांना बिबट व वाघाचे दर्शन होत होते. आज दुपारी पंडित दिनदयाळ वार्डाती राम अवध चौहान व त्याची पत्नी लालबच्ची चौहान दोघेही कारवा रोड लगतच्या जंगलातील नाल्याजवळ बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी लालबच्ची हिचा पती सरपण गोळा करत होता. दरम्यान झुडूपात दबा धरून असलेल्या वाघाने तिच्यावर झडप घेऊन नर्डीचा घोट घेत फरपटत नेऊन लालबाच्चीचा बळी घेतला. यामुळे राम अवध भयभीत झाला. त्याने रस्त्यावर येऊन आरडाओरड करून ये – जा करणाऱ्यांची पत्नीला वाचविण्याची विनंती केली. मात्र तिला मदत मिळण्यापुर्विच ती गतप्राण झाली.
. या घटनेची माहिती नागरिकांनी बल्लारपूरचे वन परीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे व बल्लारपूर पोलिसांना दिली. वन विभागाचे पथक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनासाठी दाखल होऊन पंचनामा केला. लालबच्ची चौहान हिचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. या घटनेचा अधिक तपास बल्लारपूरचे वन परीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे व बल्लारपूर पोलीस करत आहे.
वाघाला जेरबंद करण्यासाठी आठ ठिकाणी ट्रॅप कॅमेरे ” बल्लारपूर वन विभागाच्या वतीने वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या लालबच्ची चौहान हिच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान दिले आहे. या जंगल व्याप्त भागात वाघाला जेरबंद करण्यासाठी आठ ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले, असून नरभक्षी वाघाचा शोध घेतला जात आहे. याची माहिती मध्य चांदा वन विभागाच्या उपवनसंरक्षक स्वेता बोड्डू ,सहायक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांना देण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई केली जात आहे. नरेश भोवरे, वन परीक्षेत्र अधिकारी, बल्लारपूर


