कायमचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांकडून मागणी
सिंदेवाही : नवरगाव उपवन क्षेत्रातील नाचनभट्टी बिटातील गडबोरी मध्ये मागील १५ दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून दिवसाढवळ्या गावातील बकऱ्या ठार करीत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा. अशी गावकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.
. गडबोरी गावाची भौगोलिक रचना ही मुळात पहाडी लगत झाली असून याठिकाणी वाघ, बिबट, अस्वल, डुकरे, यासारखे वन्यप्राण्यांना राहण्यासाठी सोयीची जागा असल्याने गडबोरी गावात मानव वन्यजीव संघर्ष नेहमी होत आहेत. मागील १५ दिवसापासून गडबोरी गावात बिबट्याने बस्तान मांडले असून दररोज गावातील शेळ्या, बकऱ्या , ठार करीत आहे. मागील दोन दिवसापूर्वी गावालगत बिबट्या, वाघ, तडस, आढळले असल्याचे गावातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. याबाबत वनविभागाला माहिती दिली असता, गावात येऊन केवळ फटाके फोडण्याचे काम वनविभागाकडून होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
. गावात मोकाट कुत्रे फिरल्यासारखे बिबट फिरत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असल्याचे नागरिकांनी माध्यमांना सांगितले आहे. वनविभागाने केवळ फटाके फोडण्याचे काम न करता, बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा. अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.


