Home चंद्रपुर जिल्हा विशेष मुल शहरात चाकूने भोसकून तरुणांची हत्या

मुल शहरात चाकूने भोसकून तरुणांची हत्या

1222

पंचायत समिती कार्यालयासमोर थरार

तीन अटकेत

एक फरार

24 तासाच्या आत आरोपी अटकेत

मुल : दुचाकीवर बसून मोबाईलवर बोलत असलेल्या एका तरुणाला चार युवकांच्या टोळीने अचानक हल्ला करीत छातीवर, पोटावर व कंबरेवर सपासप वार करत हत्या केल्याची घटना मुल शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर शनिवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडली. रितिक अनिल शेंडे (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर राहुल सत्तन पासवान (२०), अजय गोटेफोडे (२२) व 1 विधिसंघर्ष बालक असे आरोपीची नावे असून 24 तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने तीन आरोपींना अटक केली असून हत्या प्रकरणातील 1 आरोपी फरार असल्याची माहिती आहे.

.      प्राप्त माहितीनुसार मृतक रितीक शेंडे हा पंचायत समिती कार्यालयासमोरील बसस्थानकाजवळ दुचाकीवर बसून मोबाईलवर बोलत असताना अचानक आरोपी युवकांनी रितिकच्या छातीवर, पोटावर व कंबरेवर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात रितीक रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. आरोपी यावरच थांबले नाही तर रस्त्याने ये – जा करणाऱ्या नागरिकांना चाकू दाखवून “चले जाओ नहीं तो हम तुम्हे भी खतम कर देंगे” अशी चेतावणी दिली. भीतीने जवळपास असलेले नागरिक तहसील कार्यालयाच्या गेटच्या आतमध्ये गेले. मात्र रीतिकला वाचवायला कुणीही धावून गेले नाही. रितीक ला मारल्यांनंतर आरोपीनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप आगडे यांनी रीतिकला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले.

.     वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रितिकला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक दिनकर ठोसरे दाखल होत त्यांनी पंचनामा केला, आरोपिंना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसोटीने प्रयत्न करीत राहुल पासवान, अजय गोटेफोडे व विधिसंघर्ष बालकाला चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अटक केली. आरोपीवर कलम 103 (1), 3(5) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करीत मुल पोलीसांच्या ताब्यात दिले.

.      सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलीस करीत आहे.

वारंवार त्रास देत असल्याने केली हत्या

मृतक रितीक शेंडे यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता, रितीक गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने तो वारंवार राहुल पासवान ला धमकी देत त्रास द्यायचा, रितीक वारंवार त्रास देतो म्हणून राहुल ने हा त्रास कायमचा संपविण्याचा निर्णय केला व यामध्ये आपल्या मित्रांची साथ घेत 27 डिसेंबर रोजी रितीक वर चाकूने वार करीत त्याची हत्या केली. असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.

error: Content is protected !!