परीक्षा रद्द ; परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा गोंधळ
विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक फटका
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रिक्त असलेल्या लिपिक, तसेच शिपाई पदांसाठी ऑनलाईन परीक्षांचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथील केंद्रावर ही परीक्षा सुरु होती. परंतु सकाळी १० वाजताच्या पहिल्याच शिफ्टदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन टिक केलेले उत्तर हे काही वेळाने बदलत असल्याचे लक्षात आले. यामुळे विद्यार्थी गोंधळात सापडले. त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती प्रक्रिया मागील अनेक वर्षापासून विविध कारणांनी गाजत आहे.
. विधानसभा निवडणुकीच्या काळात तर सरकार खात्याने व स्वत: मुख्यमंत्र्यांनी या नोकर भरतीला स्थगिती दिली होती. मात्र नागपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा बँकेच्या नोकर भरतीत राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असा निकाल देत नोकर भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठविली होती. बँकेने मुंबई येथील आयटीआय लिमिटेड या कंपनीला ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी करारबध्द केले आहे. विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, अमरावती व गोंदिया या चार जिल्ह्यासोबतच पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, नांदेड या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आहेत. नागपूरात १४, पुणे ८ तर नाशिक येथे ७ तर नांदेड येथे एक परीक्षा केंद्र आहे. इतर सर्व जिल्ह्यात दोन परीक्षा केंद्र देण्यात आलेली आहे.
. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथील २६१ लिपिक तर ९७ शिपाई पदाकरिता ७ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यामुळे २१, २२ व २३ डिसेंबर रोजी या पदांसाठी राज्यभरातील ३७ केंद्रावर ऑनलाइन परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पहिल्याच शिफ्टला गोंधळ उडाला काही विद्यार्थ्यांचे उत्तर हे सबमिट होत नसल्याचे तसेच काहींचे उत्तरे अचानक चेंज होत असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांनी गोंधळ करताच आयआयटी कंपनीने परीक्षा रद्द करून सदर परीक्षा २३ डिसेंबरला घेणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले विद्यार्थ्यांनी गोंधळ करताच आयआयटी कंपनीने परीक्षा रद्द करून सदर परीक्षा २३ डिसेंबरला घेणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. यामुळे काही विद्यार्थ्यांनी परीक्षेतील घोळाची चौकशी करण्याची मागणी केली.
. राज्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर ऑनलाईन संगणक सर्वर डाऊन झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर येत गोंधळ घालून परीक्षा बंद पाडली आहे. तसेच अनेक विद्यार्थी चंद्रपूर बँकेत फोन करून याबाबतची माहिती देत होते. मात्र बँकेकडून कोणीही फोन घेऊन उत्तर देत नसल्याने विद्यार्थी आणखीच संतापले.
एका जागेसाठी 40 लाख : आमदाराचा विधानसभेत आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरतीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे. एकूण ३५८ पदांसाठी ही भरती सुरू आहे. बँकेच्या वर्तुळातून काही दलालांनी तीन ते चार दिवसांपासून उमेदवारांना फोन केले. एका जागेसाठी ४० लाख रुपये मागत असल्याचा आरोप केला आहे. आमदार जोरगेवार औचित्याच्या विषयात प्रश्न करताना विधानसभा अध्यक्ष यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. तसेच परीक्षा प्रक्रियेत देखील घोळ असल्याचे म्हटले आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून ३१ हजार १५६ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज आले आहेत. ही परीक्षा राज्यातील नऊ जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर सुरू आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्हा बँकेची परीक्षा चंद्रपूर जिल्ह्यात घेण्यात यावी, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नांदेड व जालना जिल्ह्यांचा काय संबंध असा प्रश्न आमदार जोरगेवार यांनी उपस्थित केला आहेत.
पहिल्या सत्रातील पेपर रद्द जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज पहिल्या पेपरला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने आजचा पेपर रद्द करण्यात आला आहे असे बँकेच्या वतीने कळविण्यात आले आहे. दरम्यान सर्वच परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरती नमनालाचपुढे ढकलण्याची नामुष्की बँकेवर ओढवली आहे. आज शनिवारी नागपूर व अन्य केंद्रावरील परीक्षे दरम्यान तांत्रिक चुकीचा फटका परीक्षार्थींना बसला. चंद्रपूर व ग्रामीण भागातून कालपासून परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या उमेदवारांना परीक्षा सुरु होताच पुढे ढकलत असल्याचा संदेश देण्याची पाळी परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेवर आली. यामुळे उमेदवारांना आर्थिक, मानसिक ताण सहन करावा लागतो आहे. बँक चंद्रपूर जिल्ह्यातील. परीक्षा नागपूर, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद केंद्रावर. आधीच नियोजन चुकीचे आणि आता पहिल्या सत्राचा पेपर रद्द केला आहे असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी सांगितले. दरम्यान आज दुपारच्या सत्रातील व २२ आणि २३ डिसेंबर चे पेपर होणार आहेत. तसेच आजचा रद्द आलेला पेपर २३ रोजी होणार आहे अशीही माहिती त्यांनी दिली.
आर्थिक फटका बँक देतील काय? चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेसाठी भद्रावती तालुक्यातील विसलोन या खेड्यातून आलो. एक दिवस अगोदरच औरंगाबाद येथे पोहचलो. 2 हजार रुपयाची होटल मध्ये रूम केली. सकाळीच परीक्षा केंद्रावर पोहचलो. वेरिफिकेशन झाले परंतु पेपर सुरु झाल्यानंतर सॉफ्टवेअर मध्ये बिघाड असल्याचे परीक्षकांनी सांगत 2 तास थांबण्यासाठी सांगितले नंतर पेपर सोडविण्यासाठी 2 तास अधिक वेळ देण्यात येणार असल्याचे पुन्हा सांगण्यात आले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सांगून २३ डिसेंबरला पेपर होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे परीक्षेतील या गोंधळाची चौकशी होणे गरजेचे आहे. पदमाकर गोंडे, परीक्षार्थी विसलोन, जि. चंद्रपूर


