Home सामाजिक वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणार – आ. करण देवतळे 

वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणार – आ. करण देवतळे

1298

मतदारांचे मानले आभार

वरोरा : स्व. संजय देवतळे यांची हारलं तर लाजायचे नाही आणि जिंकलं तर माजायचे नाही अशी शिकवण होती. ती शिकवण कृतीत उतरण्याचा प्रयत्न करील, मला मिळालेला विजय हा माझा एकट्याचा नसून सर्वसामान्य जनतेचा आहे. यामुळे या सर्वांच्या हितासाठी आपण काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, तसेच या विधानसभा क्षेत्रात विकास कामा संदर्भातील वडील स्व. संजय देवतळे यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करू असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार करण संजय देवतळे यांनी केले. पुढे बोलताना त्यांनी प्रशासकीय कामात अधिकारी किंवा कर्मचारी पैशासाठी त्रास देत असेल तर तशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होताच त्याची दखल घेऊ, सोबतच स्थानिक बेरोजगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले.

.     वरोरा विधानसभा क्षेत्रातून भरघोस मताने विजयी झाल्याबद्दल आमदार करण संजय देवतळे यांनी जनतेचे आभार मानण्याकरिता सभा आयोजित केली होती, या सभेत ते बोलत होते.

.       डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील प्रांगणात ३० नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास झालेल्या या सभेला अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय  मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. विजय देवतळे, भाजपा विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर, बाबा भागडे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, रिपाईचे ॲड. विनोद वानखडे, सुनील गायकवाड, बाजार समितीचे संचालक बाळू भोयर, राष्ट्रवादीच्या रंजना पारशिवे यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

.       या सभेत बोलताना डॉ .विजय देवतळे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. जागृत मतदारांनी साम, दाम, दंड भेद याला न जुमानता हुकूमशाही आणि दडपशाही संपवित करण देवतळे यांच्या रूपाने सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार आमदार म्हणून निवडला असे ते म्हणाले. करण देवतळे आपल्या कारकिर्दीत प्रत्येक गावाला न्याय देण्याचे काम करेल, तसेच कुणी धमकी देत असेल, घाबरवण्याचा प्रयत्न केला तर घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे ते म्हणाले.

.        शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी आपल्या भाषणात एकोणा कोळसा खाणीतून निघणाऱ्या कोळशाची वरोरा शहरातून वाहतूक होत असल्याने होणाऱ्या प्रदूषण आणि अपघात तसेच रस्त्याची दुरावस्था यांच्या प्रश्नाला हात घातला. सिंचनासाठी आवश्यक असलेले पोथरा धरणाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाही. कालव्याला अनेक ठिकाणी भेगा पडल्याने पाणी जागेवरच मुरते हा प्रश्न उपस्थित करून कालव्याच्या दुरुस्तीच्या कामात होणाऱ्या भ्रष्टाचाराचा प्रश्न करण देवतळे यांनी मार्गी लावावा असे ते म्हणाले.

.      स्व. संजय देवताळे यांनी कधीही जाती-पाती आणि धर्मामध्ये भेदभाव केला नाही. त्याची पावती म्हणून आज जनतेने करण देवतळे यांना आमदार म्हणून निवडून दिले यासाठी मतदारांचे त्यांनी आभार मानले. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिरे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात आमदार करण देवतळे यांना निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले .संपूर्ण महाराष्ट्रात मतदारांनी विरोधकांची चांगलीच फजिती केली असून विरोधकांकडे विरोधी पक्ष नेता होऊ शकण्याची क्षमता राहिलेली नाही हे दुर्भाग्य असल्याचे ते म्हणाले . मागील दहा वर्षात या मतदारसंघात रेंगाळलेले प्रकल्प ‌पुढील काळात  पूर्ववत सुरु होणार, २० हजार कोटी रुपये खर्च करून निप्पाण डेंड्रो  प्रकल्प भद्रावती येथे उभा राहणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी मतदारांना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  बाबा भागडे यांनी तर संचालन वैभव लोहकरे यांनी केले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

error: Content is protected !!