वासेऱ्याच्या भरवशावर भागविली जात आहे तहान
ग्राम प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष
सिंदेवाही : पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या गट ग्राम पंचायत सिंगडझरी येथे मागील तीन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या असून याकडे ग्राम पंचायत प्रशासनाने पूर्णतः डोळेझाक केले असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या जवळच असलेल्या वासेरा येथील हातपंपावरून पिण्याचे पाणी मिळत असल्याने नागरिकांची तहान भागत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले.
. सिंगडझरी ही गट ग्राम पंचायत असून यामध्ये पांढरवाणी, आणि पिपरहेटी ही गावे समाविष्ट करण्यात आली आहे. एकूण ७ सदस्य असलेल्या या ग्राम पंचायत मध्ये मनीषा गेडाम या महिला सरपंच पदी असून पिपरहेटी येथे राहतात. सिंगडझरी येथे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत म्हणून गावात जिल्हा परिषद मार्फत नळ योजना कार्यान्वित असून सदर नळ योजना कंत्राटदार मार्फत चालविण्यात येत आहे. मात्र मागील सहा महिन्यापूर्वी सदर नळ योजना पूर्णतः बंद पडलेली आहे. याकडे संबधित कंत्राटदार तसेच पंचायत समितीचे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी दुर्लक्ष केले.
. गावात काही हातपंप असून एक ते दोन हातपंप सुरू असून बाकी सर्व हातपंप नादुरुस्त अवस्थेत आहेत. सध्या उन्हाची दाहकता वाढत असल्याने मागील ३ महिन्यापासून या गावात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. या समस्येकडे ग्राम पंचायत प्रशासन गांभीर्याने बघत नसल्याने लगत असलेल्या वासेरा गावातील हातपंप वरून नागरिकांना पाणी आणावे लागत आहे. गावात १०० टक्के नागरिक हे मोल मजुरी करून जीवन जगणारे लोक आहेत. मात्र मजुरी सोडून पाण्यासाठी रात्रीचे ३ वाजता पासून हातपंप वर बसून राहावे लागत आहे. वासेरा येथील नागरिकांची सुद्धा पाण्यासाठी बोंबाबोंब असताना सिंगडझरी येथील नागरिक पाण्यासाठी वासेरा येथील हातपंप वर पहाटेपासूनच गर्दी करीत असतात. याबाबत ग्राम प्रशासन मुंग गिळून गप्प बसले असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नलेश्वर तलाव वरून असलेली नळ योजना काही कारणास्तव बंद पडलेली आहे. मात्र गावातील पाण्याची भीषण समस्या लक्षात घेता लवकरच बंद असलेली नळ योजना सुरू करणार आहे. कुलकर्णी, उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय, पंचायत समिती सिंदेवाही.


