Home चंद्रपुर जिल्हा विशेष वेजगाव बंधाऱ्याच्या कामात वीज व रेतीचा अवैध वापर

वेजगाव बंधाऱ्याच्या कामात वीज व रेतीचा अवैध वापर

1358

महावितरण व महसूल अधिकारी कोमात

ठेकेदार मालामाल

कोठारी : भ्रष्टाचाराचे कुरण समजल्या जाणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत करण्यात येत असलेल्या बंधाऱ्याचे कामात महसूल विभाग व वीज महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून अवैध रेती तसेच अवैध विजेचा खुलेआम वापर ठेकेदाराकडून होत असल्याचे दिसून आले आहे.सदर बांधकाम मागील वीस ते पंचवीस दिवसापासून सुरू असून दोन्ही विभागाचे अधिकाऱ्यामुळे शासनाचा महसूल व वीज वितरण कंपनीला चुना लावण्याचे काम सुरू आहे.

.        गोंडपीपरी तालुक्यातील महाराष्ट्र व तेलंगणा सीमेवर असलेल्या वेजगाव नाल्यावर मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत बंधाऱ्याचे काम मागील वीस दिवसापासून सुरू आहे. या बंधाऱ्याचे बांधकामासाठी लाखो रुपये मंजूर करण्यात आले आहेत. बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचे पैसे शासनाकडून देऊ केले आहेत. मात्र ठेकेदाराने बांधकामासाठी लागणारी रेती त्याच नाल्यातून अवैधरित्या उत्खनन करून ट्रॅक्टरने वाहतूक करून त्याचा वापर करीत असल्याचे समजते. सध्या या कामाच्या ठिकाणी पंधरा ते वीस ब्रास रेतीचा साठा करण्यात आला आहे. बांधकामासाठी लागणारे लोखंड कापण्यासाठी तसेच मुक्कामी असलेल्या मजुरांना रात्रीचा वीज पुरवठा वीज तारावरून अवैधरित्या आकडे टाकून घेण्यात आल्याचे प्रत्यक्षात दिसून आले.

.        याकडे महसूल विभाग व वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष जाऊ नये यातच त्यांच्यातील कर्तव्य दक्षतेचा परिचय देत आहे. तोहोगाव-लाठी या मुख्य मार्गावरील वेजगावच्या नाल्यावर सदर प्रकार येणाऱ्या-येणाऱ्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत असताना अधिकाऱ्यांना दिसत नसावे याचे नवल जनमाणसात चर्चेचा विषय ठरला आहे. चोरीची वीज शासकीय कामात वापरणे तसेच चोरीची रेती वापरने दखलपात्र गुन्हा नाही काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. एरवी सर्वसामान्य नागरिकांना चोरीची वीज वापरल्यास त्यांचेवर पोलिसात गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात महावितरणचे अधिकारी मागेपुढे पाहत नाही. तसेच गोरगरिब घरकुलांसाठी रेतीचा वापर करताना दिसताच तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार त्यांचेवर अवैध रेती वापराची कारवाई करतात. सर्वसामान्यांना शासनाचे नियम, कायदा लागू आहे तर शासकीय कामात अवैध वीज व रेतीचा वापर बिनदिक्कत करणाऱ्या ठेकेदारास सूट देण्याचे प्रावधान आहे काय.

.        मागील वर्षी तोहोगाव नजीक पाचगाव नाल्यावर याच विभागाकडून साठ लाखाचा बंधारा बांधकाम करतांना चोरीची वीज पाचशे मीटर अंतरावरून आकडे टाकून घेण्यात आली होती. त्याची तक्रार झाल्यानंतर वीज वितरणाचे डोळे उघडले व कारवाई करण्याचे महत्कार्य तीन महिन्यानंतर केले. तसेच त्यावर रेतीचा अवैध वापर करण्यात येत असल्याचे गोंडपीपरी तहसीलदार यांना समजताच रेती साठा जप्त करून दंडात्मक कारवाई केली होती. आता वेजगाव बंधाऱ्याचे कामावर त्याच ठेकेदाराकडून तसाच प्रकार सुरू आहे. अधिकाऱ्यांना मॅनेज करून शासकीय मालमत्तेचा वापर ठेकेदाराकडून सुरू असून शासनाच्या महसुलाला चुना लावण्याचे कार्य होत असल्याचे दिसून येत आहे.

.        पाचगाव नाल्यावर साठ लाख रुपये खर्च करून निकृष्ठ बंधाऱ्याचे काम करण्यात आले.सदर बंधाऱ्याचे दोन्ही बाजूने नाला खोलीकरण करण्यात आले नाही. पाणी अडविण्यासाठी बांधाऱ्यात पाट्या टाकण्यात आल्या नाही. बांधकामात सिमेंट कमी व रेती, गिट्टी जास्त वापरल्याने जागोजागी भेगा पडल्या आहेत. अत्यंत निकृष्ठ दर्जाचा बंधारा अभियंत्याचे डोळ्यादेखत बांधला तरीही देयके मंजूर करण्यात विचार अधिकाऱ्यांनी केला नाही. त्यासाठी अधिकाऱ्यांना चांगली बिदागी देण्यात आली असावी. निकृष्ठ कामाच्या तक्रारी कितीही करा मृद व जलसंधारण विभागाकडून यावर कारवाई करण्यास चालढकल केली जाते. पाचगावचा निकृष्ठ बंधारा बांधणाऱ्या ठेकेदाराकडून वेजगाव येथील बंधारा बांधण्यात येत असल्याने काम किती दर्जेदार होणार याची कल्पना न केलेली बरी.

.        मृद व जलसंधारण विभागाचे काम जमिनीत पाणी मुरविण्याचे आहे. मात्र या विभागाअंतर्गत निव्वळ भ्रष्टाचाराचे पाणी मुरते असे अनेकदा दिसून आले आहे. त्याचे मूर्तिमंत उदाहरण एक वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या पाचगाव बांधाऱ्यात दिसून आले आहे. आतातरी मृद व जलसंधारण अधिकारी दर्जेदार काम करवून घेतील तसेच गोंडपीपरी तहसीलदार व गोंडपीपरी वीज वितरण अधिकारी अवैध कामांना कारवाईचा बडगा उगारून सराईत ठेकेदारावर गुन्हे दाखल करून कारवाई करतील अशी आशा वेजगाव परिसरातील नागरिक करीत आहेत.

error: Content is protected !!