Home चंद्रपुर जिल्हा विशेष घरकुल विभागातील कर्मचारी गेले संपावर

घरकुल विभागातील कर्मचारी गेले संपावर

1261
  • लाभार्थी देयका पासून आले वंचित
  • घराचे बांधकाम थांबले

सिंदेवाही : शासनाची अत्यंत महत्वाची व लक्षवेधी योजना म्हणजे ग्रामीण घरकुल योजना. या योजनेत काम करणारे राज्यस्तरीय, विभाग स्तरीय, जिल्हास्तरीय, व तालुका स्तरीय ऑपरेटर तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. या महागाईच्या काळात मिळणाऱ्या मानधनातून कुटुंबाचा गाडा हाकणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे मूळ मानधनामध्ये वाढ करण्यात यावी. तसेच मिळणारे मानधन हे प्रत्येक महिन्याला मिळावे. यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी घरकुल विभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी ७ मार्च पासून बेमुदत संपावर गेले असल्याने घरकुल लाभार्थ्यांची देयकासाठी चांगलीच धावपळ सुरू आहे.

.       केंद्र पुरस्कृत, तसेच राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेचे काम कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सध्या शीघ्र गतीने सुरू आहे. रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाना घरकुल ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर, आणि तालुकास्तरीय, संगणक ऑपरेटर मागील अनेक दिवसापासून काम करीत आहेत. मात्र कामाच्या मोबदल्यात मिळणारे मानधन हे खूपच तुटपुंजे आहे. तसेच सध्या मिळणारे मानधन हे मागील ४ महिन्यांपासून रखडलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व घरकुल ऑपरेटर यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सध्या मिळत असलेले थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, तसेच घरकुल विभागात काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवून देण्यात यावे. ही मागणी करीत जिल्ह्यातील सर्व संगणक ऑपरेटर बेमुदत संपावर गेले असून याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.

.       परिणामी घरकुल योजनेतील लाभार्थी मिळणाऱ्या हप्त्यापासून वंचित झाले असल्याने घराचे पुढील बांधकाम सुद्धा थांबलेले आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित या मागणीकडे लक्ष घालून घरकुल विभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी सिंदेवाही पंचायत समिती घरकुल विभागाचे ऑपरेटर राजेंद्र खोब्रागडे, यांचेसह ऑपरेटर मीनाक्षी क्षीरसागर, प्रकाश घडसे, स्वप्नील भगत , सचिन बुरांडे, यांनी केली आहे.

error: Content is protected !!