- विकास कामे खोळंबली ; शासनाचा निधी परत जाण्याच्या मार्गावर
- दाखल्यांसाठी गावकर्यांची दाणादाण
किशोर डुकरे
वरोरा : तालुक्यातील भटाळा ग्राम पंचायत चे ग्राम विकास अधिकारी सतत गैर हजर राहत असल्यामुळे गावातील विकास कामे खोळंबली आहे. मार्च महिन्या अगोदर मंजूर झालेले कामे पूर्ण करणे गरजेचे असताना मात्र ग्राम विकास अधिकारी ग्राम पंचायत कार्यालयाला दांडी मारत असल्याने शासनाचा लाखो रुपयाचा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. विविध दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांना ग्राम विकास अधिकारी नॉट रिचेबल राहत असल्याने आल्या पावली परत जावे लागत आहे.
. वरोरा तालुक्यातील 9 सदस्य संख्या असलेल्या भटाळा ग्रामपंचायत व गट ग्रामपंचायत सालोरी या दोन्ही गावांचा ग्रामविकास अधिकारी आशिष सुखदेवे यांच्या कडे 1 वर्षा पासून पदभार आहे. भटाळा येथे आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार असे 3 दिवस कामाचे ठरविले असून ते तिनही दिवस नियमित येत नसल्याने ग्राम पंचायत चे कामकाजावर विपरीत परिणाम पडला असून पदभार स्वीकारल्या पासून त्यांनी कामावर दांड्या मारण्याला सुरवात केली. ते आपल्या कामावर नियमित येत नसल्याच्या तक्रारी गटविकास अधिकारी यांचे मार्फत मुख्य कार्यपालन अधिकारी यांचे कडे ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी केल्या आहे. असे असतांनाही ग्रामविकास अधिकारी आशिष सुखदेवे यांच्यावर कोणताही परिणाम पडला नसल्याचे दिसून येत आहे. तर या ग्रामविकास अधिकार्यावर वरोरा चे संवर्ग विकास अधिकारी यांनी कोणतेही कारवाही केली नाही.
. 5 दिवसावर येऊन ठेपलेल्या महाशिवरात्री उत्सव करिता ग्रामविकास अधिकारी अभावी ग्राम पंचायत कडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. नाल्याचा उपसा करण्यात आला नाही. संपूर्ण नाल्या गाळाने तुटुंब भरल्या आहे. नुकतेच सुरू झालेले आर्थिक वर्ष आणि त्या बरोबर होणारी गावातील सर्व विकास कामे ठप्प झाली आहेत. ग्रामसेवक कधी येणार ? असे प्रश्न गावकरी विचारात आहे. ग्रामसेवकाविना गाव आणि कसे चालवावे काम ? हा गंभीर प्रश्न गेल्या वर्षभरापसून सरपंच, उपसरपंचसह सर्व सदस्यांना पडला आहे. प्रधानमंत्री आवास योजना साठी अनेकांना घरकुल मंजूर झाले. मात्र कागदांचे पूर्तता करण्यासाठी कागदपत्रांवर ग्रामविकास अधिकार्याची सही लागत असल्याने गावकर्यांना हेलपाट्या माराव्या लागत आहे. गावातील विकास कामे व गावकर्यांना दाखल्यांसाठी भटकंती करण्यासाठी भाग पाडणारे व ग्रामपंचायतला दांडी मारणार्या ग्राम विकास अधिकारी आशिष सुखदेवे यांच्या वर कठोर कारवाही करावी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भटाळा ग्राम पंचायत ला स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी द्यावा अशी मागणी गावकरी करीत आहे.
महाशिवरात्री यात्रेचे नियोजन शून्य भटाळा गाव हे ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखले जाते. या गावात हेमाडपंथी शिव मंदिर आहे. याच महिन्यात दिनांक 8 मार्च ला महाशिवरात्री आहे. त्यानिमित्य गावात भव्य यात्रेचे आयोजन केल्या जाते. ही यात्रा पाहण्यासाठी व शिवमंदिराचे दर्शन घेण्यासाठी कोसोदूर अंतरावरून भाविक येत असतात. या यात्रेचे नियोजन ग्राम पंचायत भटाळा यांनाच करावे लागत असते. मात्र ग्रामविकास अधिकार्याच्या अडेलतट्टू व दांडीमारी धोरणामुळे ग्राम पंचायत पदाधिकार्यांसमोर मोठे आवाहन ठाकले आहे.
भटाळा ग्रामपंचायत ला ग्रामविकास अधिकारी म्हणून आलेले आशिष सुखदेवे यांची सुरवातच वादग्रस्त ठरली. आमच्या ग्रामपंचायतला स्वतंत्र ग्रामविकास अधिकार्याचे पद असताना प्रभारी अधिकारी देण्यात आला. ते नेहमी गैरहजर राहत असल्याने विकास कामांना व नागरिकांना होणार्या अडचणी बाबत आम्ही संवर्ग विकास अधिकारी यांच्या मार्फत मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केली होती. मात्र कारवाही शून्य असल्यामुळे त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. 5 दिवसावर असलेल्या महाशिवरात्री निमित्य मोठी यात्रा भरली जाते. यात अनेक दुकाने थाटली जातात. त्यांना नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा अधिकार ग्रामविकास अधिकार्यांना असतो. मात्र ते येत नसल्याने सरपंच यांनाच परवाने द्यावे लागत आहे. अनेक शासकीय कामासाठी आम्हाला स्वतालाच जावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड आमच्या खिशाल्याच बसतो. हरिष जाधव, उपसरपंच, भटाळा


