शेतकर्यांची भयावह स्थिती
बल्लारपूर
. पीक जगविण्यासाठी शेतातील विहिरीला पाणी असले तरी वीज वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा दिवसांऐवजी रात्रीला साडेनऊ ते सकाळी सात वाजेपर्यंतच केला जातो. त्यामुळे दिवसभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी काळोख्यात रात्र काढावी लागते. झुडपी जंगल परिसरातील शेती शिवारात भटकणारे वन्यप्राणी, साप, विंचू आधीची पर्वा न बाळगता जीव मुठीत घेऊन सिंचनासाठी रात्र जागवावी लागते. अशावेळी ‘फ्युज’ गेलाच तर ते टाकायचे काम शेतकरीच करतात. त्यामुळे दिवसा कष्ट, रात्री जागरण, कारण ठरतेय महावितरण! असेच म्हणावे लागेल.
. ऐन थंडीच्या दिवसात दिवसभर वीज गायब आणि रात्री शेतीसाठी वीज उपलब्ध या प्रकाराने शेतकरी हैरान झाले आहेत.विजेच्या हक्काचा ग्राहक शेतकऱ्याला फक्त रात्रीच वीजपुरवठा करून महावितरण शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे.दिवसरात्र काम काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा व अन्याय का,असा सवाल पालकमंत्री व महावितरणला करण्यात येत आहे. जगाचे पोशिंदा म्हणून का मिरवायचे असा संतप्त सवाल बल्लारपूर तालुक्यातील कोठारी परिसरातील शेतकरी करीत आहेत.
. यंदा बळीराजाला खरीप हंगामात अति पावसाचा फटका बसला असून, रब्बी हंगामात पिके वाचविण्यासाठी शेतकरी दररोज आव्हानांचा सामना करीत आहे. पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांना अनेक संकटांशी दोन हात करावे लागत आहेत. भारनियमनामुळे स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी सिंचन करीत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कृषी पंपांना रात्री वीजपुरवठा केल्या जात असल्याने शेतकरी दिवसभर शेतात राबल्यानंतर, पुन्हा रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जागरण करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
. सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामात प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पिकावर अज्ञात व्हायरसने आक्रमण केल्याने पीक नष्ट झाले. त्यानंतर परतीच्या पावसामुळे सोयाबीनची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. कपाशीच्या पिकावर आशा होती; मात्र बोंडअळीने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी आर्थिक संकटात असतानाही पैशांची जुळवाजुळव करून रब्बी हंगामात पेरणी केली. सद्यास्थितीत गहू, हरभरा, पिके बहरलेली आहेत. चांगले उत्पादन व्हावे, यासाठी शेतकरी दिवसभर शेतात राबत असल्याचे चित्र आहे. जिकडे तिकडे अंधारच अंधार असतानाही बॅटरीच्या उजेडात शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्र आहे. शेतकरी सकाळपासून शेतात राबूनही रात्री त्याच उमेदीने, त्याच इच्छाशक्तीने पिकाला पाणी देत असल्याचे दिसून येत आहे.
पावला पावलावर धोका! : शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यामध्ये सरपटणारे प्राणी यांचा धोका कायम शेतकऱ्यांच्या मानगुटीवर राहतो. तसेच सद्यस्थितीत पाणी शेवटच्या सरीतून पिकांपर्यंत पोहोचते का, याकडे लक्ष देतानाच रानडुकरांची भीती अधिक असते.
कृषी पंपांना 7 ही दिवस वीजपुरवठा द्या : “आठवड्यातून चार दिवस रात्री व तीन दिवस दिवसा असा वीजपुरवठ्याचे वेळापत्रक असल्याने रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून सिंचन करावे लागत आहे. कृषी पंपांना सातही दिवस वीजपुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे .

