वरोरा येथील दोन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
वारंवार नोटिसा देऊनही कामात निष्काळजीपणा
आढावा बैठकीला गैरहजर राहिल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून पोलीस कारवाई
वरोरा : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘एसआयआर’ (SIR) सर्वेक्षण आणि मॅपिंग प्रक्रियेत गंभीर दिरंगाई तसेच कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी वरोरा येथील दोन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर (BLO) वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवार सूचना आणि नोटिसा देऊनही कामात सुधारणा न झाल्यामुळे प्रशासनाने अखेर हे कडक पाऊल उचलले असून, या कारवाईमुळे शासकीय कर्मचारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सहा महिन्यांत ३५ टक्क्यांपेक्षा कमी काम
शासनाच्या सुरू असलेल्या ‘एसआयआर’ सर्वेक्षणासाठी वरोरा येथे ‘बीएलओ’ म्हणून सुरेश जनार्दन मसराम आणि मोरेश्वर लक्ष्मण सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यावर सर्वेक्षणाचे काम अचूक आणि ठराविक वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, तब्बल सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही मतदान केंद्र क्र. १६७ चे अधिकारी सुरेश मसराम यांचे काम केवळ ३५ टक्क्यांवर, तर मतदान केंद्र क्र. १८८ चे अधिकारी मोरेश्वर सातपुते यांचे काम केवळ ३१ टक्क्यांवर रेंगाळले होते.
शासकीय सेवेतील पदे
गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांपैकी सुरेश जनार्दन मसराम हे हिरालाल लोया विद्यालय, वरोरा येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर मोरेश्वर लक्ष्मण सातपुते हे नगर परिषद वरोरा येथे लिपिक म्हणून कार्यरत आहेत.
तीन वेळा ‘कारणे दाखवा’ नोटीस
या दोन्ही कर्मचाऱ्यांनी मॅपिंगच्या कामाकडे साफ दुर्लक्ष केल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे. कामात गती आणण्याबाबत निवडणूक विभागाकडून यांना तीन वेळा ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात त्यांच्या कामात कोणतीही प्रगती दिसून आली नाही. अखेर मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, वरोरा यांनी १८ मे २०२६ रोजी या कामाची आढावा सभा घेतली. या अत्यंत महत्त्वाच्या सभेलाही दोन्ही केंद्रस्तरीय अधिकारी अनुपस्थित राहिले.
नायब तहसीलदारांची पोलिसांत तक्रार
वारंवार सूचना, निर्देश आणि आदेश देऊनही कामात कसलीही प्रगती न दाखवल्यामुळे अखेर वरिष्ठ पातळीवरून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या आदेशानुसार, तहसील कार्यालय वरोरा येथील नायब तहसीलदार (निवडणूक) शरद मसराम यांनी वरोरा पोलीस स्टेशन गाठून अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी, २१ मे २०२६ रोजी दोन्ही कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


