Home चंद्रपुर जिल्हा विशेष गुंजेवाहीतील दुर्दैवी घटनेची आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून गंभीर दखल

गुंजेवाहीतील दुर्दैवी घटनेची आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून गंभीर दखल

39

मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी तातडीने आधुनिक उपाययोजनांची मागणी

नुकसानभरपाई वेळेत मिळण्यासाठी ‘निगेटिव्ह ट्रेझरी सिस्टिम’ लागू करा

३० दिवसांत आर्थिक मदत देण्याची वन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे दूरध्वनीवरून मागणी

चंद्रपूर : सिंदेवाही परिक्षेत्रातील गुंजेवाही येथील वनक्षेत्रात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेची राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या भीषण घटनेत कावडबाई दादाजी मोहूर्ले (४५), अनिताबाई दादाजी मोहूर्ले (४०), सुनिता कौशिक मोहूर्ले (३८) आणि संगीता संतोष चौधरी (५०) या चारही महिलांचा मृत्यू झाला. या महिलांच्या निधनाबद्दल आ. मुनगंटीवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून, या दुःखद प्रसंगात आपण मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात पाठीशी असल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच या घटनेत गंभीर जखमी झालेल्या योगिता चंदपाल जेगटे (४५, रा. वरवट) यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्यावर योग्य उपचाराचे निर्देश दिले आहेत. ही घटना केवळ चार कुटुंबांवर आलेले संकट नसून वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाचे अत्यंत गंभीर आणि चिंताजनक स्वरूप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘निगेटिव्ह ट्रेझरी सिस्टिम’ लागू करा; ३० दिवसांत मदतीचे बंधन

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाचे सध्या चार्ज असलेले अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याशी दूरध्वनीवर सविस्तर चर्चा केली. वन्यप्राणी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासन नियमानुसार तीस दिवसांच्या आत आर्थिक मोबदला देणे कायदेशीररित्या बंधनकारक असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. निधीअभावी किंवा प्रशासकीय विलंबामुळे पीडित कुटुंबांची मदत कुठेही रखडू नये, तसेच त्यांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी नुकसान भरपाईची प्रक्रिया अधिक गतीमान करून वन विभागात ‘निगेटिव्ह ट्रेझरी सिस्टिम’ लागू करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. या चारही मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाने युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले आहे.

पारंपरिक उपायांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या

आजच्या बदलत्या परिस्थितीत पारंपरिक उपाययोजनांसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची अत्यावश्यक गरज बनली आहे, यावर आ. मुनगंटीवार यांनी विशेष भर दिला. वन विभागाने या घटनेकडे केवळ एक अपघात म्हणून न पाहता, भविष्यातील मोठा इशारा म्हणून अत्यंत गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. जंगलात नागरिकांचा जीव सुरक्षित राहण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित पूर्वसूचना प्रणाली, ड्रोन सर्व्हेलन्स, सेन्सर आधारित अलर्ट सिस्टीम, रिअल-टाईम ट्रॅकिंग आणि जंगल परिसरातील स्मार्ट मॉनिटरिंग यासारख्या अत्याधुनिक यंत्रणा विकसित केल्यास अशा दुर्घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

माजी वनमंत्र्यांचे दूरदृष्टीपूर्ण निर्णय

राज्याचे वनमंत्री म्हणून यशस्वी कार्य करत असताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी अनेक दूरदृष्टीपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतले होते. त्यांच्या कार्यकाळात संवेदनशील क्षेत्रांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबविणे, वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये सतर्कता वाढविणे, वाघांच्या संख्या नियंत्रणासाठी त्यांच्या स्थानांतरणासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय, आणि संघर्षग्रस्त भागात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला होता. वन्यजीवांच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाची यंत्रणा सक्षम करण्यात आल्यामुळेच, त्यावेळी अनेक भागांत संघर्षाच्या घटना कमी करण्यात मोठे यश आले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

शेवटी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, मानव आणि वन्यजीव यांच्यातील समतोल राखत असतानाच स्थानिक नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही शासन आणि वन विभागाची सामूहिक जबाबदारी आहे. भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यात किंवा राज्यातील कोणत्याही वनक्षेत्रात अशी हृदयद्रावक घटना पुन्हा घडू नये, यासाठी वन विभागाने तातडीने ठोस, आधुनिक आणि तितकेच परिणामकारक पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

error: Content is protected !!