बालसभेच्या व्यासपीठावरून चिमुकल्यांचे प्रगल्भ अभिवादन !
ग्रामीण भागातील जि.प. शाळाच खऱ्या अर्थाने ‘चतु:स्त्र’ विद्यार्थी घडविण्याचे केंद्र
पुस्तकी ज्ञानासोबतच जीवनाभिमुख शिक्षणाचा धडा
उद्याचे वैचारिक वक्ते घडविण्याचा जि. प. शाळेचा स्तुत्य उपक्रम
करण ठाकरे
चंद्रपूर : सध्याच्या धावपळीच्या युगात जिथे मोठ्यांच्या सभा आणि भाषणांकडे बालमन दुर्लक्ष करते, तिथे आपल्याच वयाच्या सवंगड्याला मंचावर बसून आत्मविश्वासाने बोलताना पाहून बालकांमध्ये एक नवा उत्साह आणि अचंब निर्माण होतो. हाच उत्साह उद्याच्या वैचारिक वक्तृत्वाची पायाभरणी ठरणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘बालसभे’ने हे सिद्ध करून दाखवले की, ग्रामीण भागातील मुले संधी मिळाल्यास कोणत्याही व्यासपीठावर आपली मोहोर उमटवू शकतात.
![]()
बालवयातच ‘पदाधिकाऱ्यांच्या’ भूमिकेतून जबाबदारीचे दर्शन
या बालसभेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ भाषणे दिली नाहीत, तर त्यांनी गाव आणि तालुका स्तरावरील विविध आभासी पदाधिकाऱ्यांच्या भूमिका साक्षात मंचावर साकारल्या. मंचावर पदस्थ राहून, आपण ज्या पदावर आहोत त्या पदाची काय जबाबदारी असते, हे ओळखून या चिमुकल्यांनी आपले विचार मांडले. तुटक्या-फुटक्या शब्दांत का असेना, पण मंचावर येऊन व्यक्त होण्याचे धाडस या मुलांनी दाखवले. बाबासाहेबांचे विचार केवळ पुस्तकात न राहता ते मुलांच्या नसानसात भिनावेत आणि सामाजिक समतेचा विचार प्रत्येकात रुजावा, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
जि. प. शाळा: जीवनाभिमुख शिक्षणाची पंढरी
या उपक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. “आम्हासारखे आणि समाजातील अनेक यशस्वी नागरिक याच जिल्हा परिषद शाळांच्या बाकावर घडले आहेत. सामान्य कुटुंबातील मुलांना जीवनाभिमुख शिक्षण देऊन त्यांचा चतु:स्त्र विकास करण्याची ताकद आजही केवळ आणि केवळ जि.प. शाळांमध्येच आहे, हे आम्ही ठामपणे आणि विश्वासाने सांगू शकतो,” अशा भावना पालकांनी आणि शिक्षणप्रेमींनी यावेळी व्यक्त केल्या.
उद्याचे वक्ते घडविण्याचा शिक्षकांचा ध्यास
विद्यार्थ्यांमध्ये सभाधिटपणा यावा, वकृत्वाची संधी मिळावी, कार्यक्रमाची रूपरेषा (कार्यक्रमावली) कशी असते याचे ज्ञान व्हावे आणि भविष्यात या कौशल्याचा उपयोग समाजासाठी व्हावा, या दूरदृष्टीने शाळेतील शिक्षक वर्गवार बालसभेचे आयोजन सातत्याने करत आहेत.
. या स्तुत्य उपक्रमासाठी मुख्याध्यापक विजय सातपुते, विषय शिक्षक पंडित लोंढे, विजया भोमले, सहायक शिक्षिका चंद्रकला दातारकर आणि सहायक शिक्षिका भाग्यश्री कामडी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या या मार्गदर्शनाखाली तयार झालेले हे उद्याचे वैचारिक वक्ते सामाजिक परिवर्तनाची धुरा समर्थपणे पेलतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.


