हस्तलिखित संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप
महापुरुषांच्या विचारांतून प्रगत समाजाची जडणघडण
वरोरा : स्थानिक लोकशिक्षण संस्थेद्वारा संचालित लोकमान्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि ८ ते १४ एप्रिल दरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या निमित्ताने विविध वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून महापुरुषांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
संविधान उद्देशिकेचे आगळेवेगळे वाटप
सप्ताहाची सुरुवात बुधवारी, ८ एप्रिल रोजी एका स्तुत्य उपक्रमाने झाली. आनंदवन येथील कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांच्या हस्ताक्षरात पोस्टकार्डवर लिहिलेल्या ‘भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या’ १०० प्रतींचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना या प्रतींचे वितरण करण्यात आले, ज्यातून संविधानातील मूल्यांचा प्रचार करण्यात आला.
महात्मा फुले जयंती व पदवीदान समारंभ
११ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ‘पदवीदान व वार्षिक बक्षीस वितरण’ कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीच्या संधी, भाषा कौशल्ये, शिक्षण आणि विवेक या विषयांवर मार्गदर्शन केले.
प्रेरणा गीतांतून महापुरुषांना अभिवादन
सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रेरणा गीतांचे सादरीकरण केले. यामध्ये प्रामुख्याने महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष, संत गाडगे महाराज यांचे १५० वे जयंती वर्ष आणि महाड चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष या ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवर निवडक गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
मान्यवरांचे मार्गदर्शन
कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. उत्तम देऊळकर यांनी डॉ. आंबेडकरांचे शिक्षणविषयक विचार, संत गाडगे महाराजांचे कार्यक्षेत्र आणि महात्मा फुलेंचे स्त्री-शिक्षणातील योगदान यावर सविस्तर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले आणि महापुरुषांच्या विचारांमुळेच भारतीय समाजात मूलभूत बदल घडून आल्याचे प्रतिपादन केले.
नियोजन व आभार
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. रवींद्र शेंडे यांनी केले, तर प्रास्ताविकेतून सह-कार्यक्रमाधिकारी डॉ. श्रीकांत पुरी यांनी सप्ताहाची भूमिका मांडली. उपस्थितांचे आभार कुमुद वांढरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.


