Home सामाजिक ​शिवराय-फुले-आंबेडकरांची विचारांची साखळी जपा – प्रबोधनकार राज दादा घुमणार

​शिवराय-फुले-आंबेडकरांची विचारांची साखळी जपा – प्रबोधनकार राज दादा घुमणार

68

नंदोरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा उत्साहात संपन्न

​चंद्रपूर : “छत्रपती शिवरायांनी तुकोबारायांकडून प्रेरणा घेतली, महात्मा फुलेंनी शिवरायांच्या कार्याचा आदर्श मांडला आणि त्याच प्रेरणेतून बाबासाहेबांनी क्रांती घडवली. हा विचारांचा वारसा जातीपातीत न वाटता तो एकत्रितपणे जपला पाहिजे. आजच्या काळात आपण महापुरुषांना ठराविक जातींच्या चौकटीत बंदिस्त केले आहे, ही अत्यंत खेदजनक बाब असून हे सर्व महापुरुष संपूर्ण देशाची अस्मिता आहेत,” असे प्रतिपादन गुरुदेव सेवा मंडळ युवा वाहिनीचे अध्यक्ष तथा प्रबोधनकार राज दादा घुमणार यांनी केले.

.     ​ नंदोरी येथे पंचशील बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.

.     ​ कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवाच्या पुतळ्याला व महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थानिक चिमुकल्यांनी ‘चवदार तळ्याचे पाणी’ या विषयावर हृदयस्पर्शी नाटिका सादर केली. त्यांच्या या कलागुणांनी आणि प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

.     ​ या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पंचशील बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष रवी खाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी उत्पादक कंपनीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावतीच्या उपसभापती तथा मुख्याध्यापिका अश्लेषा भोयर, माजी उपसरपंच भानुदास ढवस, माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर उमरे, माजी उपसरपंच विनोद लांबट, नंदोरी बिटचे अंमलदार नन्नावरे आणि सचिव राजेंद्र कांबळे उपस्थित होते. ​कार्यक्रमाला समाधान वाकळे, दिलीप पाटील, भीमराव खाडे यांच्यासह परिसरातील नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.     ​ कार्यक्रमाचे संचालन रमा वानखेडे यांनी केले तर आभार राजेंद्र कांबळे यांनी मानले. सायंकाळी ६ वाजता गावातून डीजेच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. निळ्या निशाणांच्या सावलीत आणि ‘जय भीम’च्या जयघोषात निघालेल्या या रॅलीने संपूर्ण नंदोरी गाव दुमदुमून गेले होते.

error: Content is protected !!