मंगल कार्यालयात तरुणाला बेदम मारहाण
आशीर्वाद मंगल कार्यालयातील घटना
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू
वरोरा : येथील आशीर्वाद मंगल कार्यालय परिसरात लग्नाच्या वरातीत फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून २० वर्षीय तरुणासह त्याच्या साथीदारांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर फटाके फोडण्यास मनाई केल्याचा राग मनात धरून वरातीतील तरुणांनी हे कृत्य केले. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी तीन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, आशीर्वाद मंगल कार्यालयात एक विवाह सोहळा आयोजित होता. वरात कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आली असता, वरातीमधील तरुण फटाके फोडून जल्लोष करत होते. फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होत असल्यामुळे शेजारी राहणाऱ्या दिलीप पाडवे यांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर फिर्यादी शाहीद इरफान रंगरेज यांनी वरातीतील लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला.
. मात्र, वरातीमधील तरुण समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या तरुणांनी शाहीद यांना गाडीवर फेकून दिले आणि त्यांच्या मान, पाठ, पोट व डोळ्यांखाली बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी कार्यालयाच्या ऑफिसमध्ये शिरून पुन्हा मारहाण केली, तसेच स्वयंपाकघरातील कर्मचारी विजय मेश्राम यालाही मारहाण करण्यात आली.
पोलिस कारवाई
या घटनेनंतर शाहीद रंगरेज यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी १) जामेश अब्दुल हारून शेख (रा. चंद्रपूर), २) शेख रहेमत शेख अहमद (रा. बल्लारशा) आणि ३) शेख काशीफ शेख साजीद (रा. अमरावती) यांच्यासह इतर ४ ते ५ अज्ञात व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११५(२), १८८(२) आणि १९० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. फिर्यादीच्या वैद्यकीय अहवालात जखमांची नोंद करण्यात आली असून, पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.


