ग्राहक पंचायतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारासमोर सिग्नल बसवण्याची मागणी
नऊ महिने उलटूनही प्रशासकीय कार्यवाही शून्य
भद्रावती : शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार चौकात दररोज होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र थांबवण्यासाठी ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ शाखा भद्रावतीने आक्रमक पाऊल उचलले आहे. या चौकात तातडीने ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात यावेत, या मागणीसाठी आज, २० मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
कोंडीमुळे नागरिक त्रस्त
या चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने सायकलस्वार, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. यापूर्वी रस्ता सुरक्षा समितीच्या ३० मे २०२५ च्या बैठकीत येथे ट्रॅफिक टाइमर सिग्नल, स्पीड ब्रेकर आणि ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम, पोलीस आणि परिवहन विभागाला देण्यात आले होते.
प्रशासनाचा दिरंगाईवर सवाल
समितीच्या आदेशाला नऊ महिने उलटूनही अद्याप कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे भद्रावतीकरांना रोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. “नऊ महिने झाले तरी सिग्नल का लागले नाहीत आणि नो पार्किंग झोन का झाला नाही? याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,” अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
. निवेदन देतेवेळी ग्राहक पंचायत भद्रावतीचे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर, भारत खोब्रागडे, अरुण जमदाडे आणि दीपक जोगी यांची प्रमुख उपस्थिती होती.


