मोहर्ली-पद्मापूर रस्त्यावरील व्हायरल व्हिडिओची वनविभागाकडून गंभीर दखल : वाहने होणार जप्त
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील मोहर्ली-पद्मापूर रस्त्यावर वाघाचा थरार पाहण्यासाठी पर्यटकांनी नियमांची पायमल्ली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाघाचा रस्ता अडवून आणि त्याचा पाठलाग करून व्हिडिओ तयार करणाऱ्यांविरुद्ध वनविभागाने कडक पावले उचलली असून, याप्रकरणी रीतसर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ?
१५ मार्च रोजी मोहर्ली-पद्मापूर रस्त्यावर वाघाचे दर्शन झाले असता, काही पर्यटकांनी आपली वाहने रस्त्यावरच थांबवून वाघाचा मार्ग रोखला. इतकेच नव्हे तर, काही अतिउत्साही व्यक्तींनी वाहनातून खाली उतरून वाघाच्या अगदी जवळ जाऊन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. वन्यजीवांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
वनविभागाची कडक कारवाई
या घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाने चौकशी सुरू केली आहे. रस्त्याच्या खाली उतरून वाघाला त्रास देणाऱ्या आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९७२ अन्वये वनगुन्हा क्रमांक-०९६५४/२११३३३ (दिनांक १५/०३/२०२६) नोंदवण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या वाहनांनी वाघाचा भ्रमणमार्ग अडवला, ती वाहने जप्त करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
आरोपींची माहिती देण्याचे आवाहन
या प्रकरणाचा तपास मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे करीत आहेत. व्हिडिओमधील आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर कोणाकडे या आरोपींची माहिती असल्यास त्यांनी ९८३४६८९५४१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
. वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासात अडथळा आणू नये आणि अशा जीवघेण्या साहसांपासून दूर राहावे, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.


