३२५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त !
बिनबा गेट परिसरातील ट्रान्सपोर्टवर ‘NDS’ पथकाची धडक कारवाई
चंद्रपूर : पर्यावरणाचे रक्षण आणि ‘प्लास्टिक मुक्त चंद्रपूर’ संकल्पनेला गती देण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. मनपाच्या उपद्रव शोध पथकाने (NDS) नुकत्याच केलेल्या एका कारवाईत बिनबा गेट बाहेरील ‘वाडी गोल्डन ट्रान्सपोर्ट’ येथून ३२५ किलो एकदाच वापरता येणाऱ्या (Single Use) प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे.
. मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने ट्रान्सपोर्ट परिसरात अचानक पाहणी केली असता १३ पोत्यांमध्ये हा अवैध साठा दडवून ठेवल्याचे आढळून आले. तपासादरम्यान हा माल गाडचांदूर येथील ‘गुरुकृपा’ यांचा असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित मालकाला मनपा कार्यालयात हजर राहून दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
. शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर आणि साठा करणाऱ्यांविरुद्ध मनपा प्रशासन सातत्याने कारवाई करत आहे. नागरिकांनीही अशा अवैध प्रकारांची माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.


