Home चंद्रपुर जिल्हा विशेष चंद्रपुरात ९१ लाखांच्या बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त

चंद्रपुरात ९१ लाखांच्या बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त

227

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

मध्य प्रदेशातील एका युवकाला अटक

भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू होता छपाईचा काळाबाजार 

चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शहरात बनावट नोटा छापणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दुर्गापूर रोडवरील राजश्री अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या या छपाई केंद्रावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल ९१ लाख १५ हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशातील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

.       १० मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, ऊर्जानगर मेजर गेटजवळील राजश्री अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर २०३ मध्ये काही लोक बनावट नोटा तयार करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. फ्लॅटला कुलूप असल्याने पोलिसांनी मालक सुमित पॉल यांना बोलावून घेतले. त्यांनी हा फ्लॅट एका महिन्यापूर्वी मध्य प्रदेशातील व्यक्तीला भाड्याने दिल्याचे सांगितले.

.        पंचांच्या उपस्थितीत फ्लॅटचे कुलूप तोडून झडती घेतली असता, बेडरुममध्ये १० पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ५०० रुपयांच्या हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटा आढळल्या. पोलिसांनी घटनास्थळावरून ९१ लाख १५ हजारांच्या नोटा, एक ईप्सन कंपनीचा कलर प्रिंटर आणि इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी शुभम दिनेश नागर (२६, रा. पंचेड, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली असून, पोलीस या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.

.      गुप्तरित्या माहिती काढून पोलिसांनी मध्य प्रदेशातील संशयिताचा शोध सुरू केला. अखेर शुभम दिनेश नागर (२६), रा. पंचेड, ता. रतलाम, जि. रतलाम (मध्य प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीने फसवणुकीच्या उद्देशाने या ५०० रुपयांच्या रंगीत छायांकित (बनावट) नोटा तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे अपराध क्रमांक १९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(२), ३१८(३), ३३६(२), ३३६(३), १८२(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.     सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक गौरव कार्यदेपाटील, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व त्यांच्या पथकाने केली.

.      या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांकरेडवार, बलराम झाडोकर, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनील गौरकार, जयसिंह, सचिन गुरनुले, संतोष येलपूलवार, गणेश मोहुर्ले, नितीन रायपूरे, रजनीकांत पुट्टावार, किशोर वकाटे, अजित शेंडे, दिनेश अराडे, प्रमोद डंभारे आणि महिला पोलीस कर्मचारी निराशा तितरे, विजयमाला वाघमारे, छाया निकोडे, अपर्णा मानकर, दीपिका सोडनार व उषा लेडांगे यांचा समावेश होता. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!