‘माझी खरी कमाई’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांना मिळणार व्यवहार ज्ञानाचे धडे
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नंदोरी बु. येथे उद्या, बुधवार दिनांक ११ मार्च रोजी सकाळी ८ वाजता ‘बाल आनंद मेळाव्याचे’ दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. “माझी खरी कमाई” या अभिनव संकल्पनेवर आधारित या मेळाव्यात विद्यार्थी स्वतः विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावणार आहेत.
. केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना श्रमाचे मूल्य कळावे, भांडवली गुंतवणूक, नफा-तोटा आणि प्रत्यक्ष बाजारपेठेतील व्यवहारांचे ज्ञान मिळावे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील व्यावसायिक कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे.
. शाळेच्या मैदानावर भरणाऱ्या या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध चविष्ट पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. तरी नंदोरी गावातील समस्त ग्रामस्थ आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या चिमुकल्यांचा उत्साह वाढवावा व खाद्यपदार्थांच्या चवीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंदाने केले आहे.
. ‘तुमची, आमची, आपली शाळा – जि.प.ची नंदोरीची शाळा’ या ब्रीदाला जागृत ठेवत आयोजित होणारा हा सोहळा सर्वांगीण गुणवत्तापूर्ण शिक्षणाची साक्ष देणारा ठरणार आहे.


