राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य
विद्यार्थ्यांना कायदेशीर संरक्षणाचे धडे
भद्रावती : तालुक्यातील पीएमश्री जि.प. उच्च प्राथमिक शाळा, चंदनखेडा येथे ‘बाल लैंगिक गुन्हा संरक्षण कायदा २०१२’ (पोक्सो) अंतर्गत विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षितता आणि त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती देण्यात आली.
. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पाहुण्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. सी. व्ही. रमण यांच्या छायाचित्राला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून ॲड. सुविर भालेराव, ॲड. सुषमा वडाळकर आणि ॲड. स्नेहा खडके उपस्थित होते. त्यांनी अतिशय सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना ‘पोक्सो’ कायद्यातील विविध तरतुदी आणि स्वरक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अनिता आईंचवार यांनी केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल कोकुडे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा शिबिराची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव मेश्राम यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंगला दडमल यांनी केले. या मार्गदर्शन सत्राचा लाभ शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकवृंदाने घेतला.


