‘विज्ञानातील महिला’ या विषयावर विद्यार्थ्यांनी सादर केले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन
वरोरा : लोकमान्य महाविद्यालयात २८ फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अद्ययावत घडामोडींची माहिती मिळावी, या उद्देशाने दरवर्षी महाविद्यालयात विविध वैज्ञानिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
. यावर्षी हा कार्यक्रम “विज्ञानातील महिला: विकसित भारत उत्प्रेरक” या संकल्पनेवर आधारित होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री उपस्थित होत्या.
. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ए.आय. टेक्नॉलॉजी, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांचे योगदान, डार्क रूम आणि विज्ञानातील विविध नाविन्यपूर्ण विषयांवर अभ्यासपूर्ण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले. आपल्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री यांनी सांगितले की, “दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या वैज्ञानिक घडामोडी आणि नवनवीन शोधांचा विद्यार्थ्यांनी सर्वंकष विचार करून आचरण करावे.” तसेच त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सरिता जानवे यांनी केले, तर प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. हिमगौरी देशपांडे यांनी करून दिला. शेवटी प्रा. पांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.


