आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
सिमेंट रस्ते व बंदिस्त नाल्यांचे होणार जाळे
कोठारी गावाच्या पायाभूत सुविधा होणार अधिक सक्षम
चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पुढाकारातून बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे. कोठारी येथील अंतर्गत रस्ते व जलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) अंतर्गत ५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यामुळे गावाचा चेहरामोहरा बदलणार आहे.
अशी होणार विकासकामे
मंजूर करण्यात आलेल्या ५ कोटींच्या निधीतून गावातील दोन प्रमुख भागांत विकासकामे केली जातील. पहिल्या टप्प्यात दिलीप पार्लेवार यांच्या घरापासून शेंडे यांच्या घरापर्यंत, तसेच कवडू गुरु ते आंबेडकर चौक आणि संत गाडगेबाबा चौक ते सचिन शेंडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व बंदिस्त नालीचे बांधकाम करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात छत्रपती चौक ते मारुती बुटले यांच्या घरापर्यंत रस्ता व नालीचे काम पूर्ण केले जाईल. या दोन्ही कामांसाठी प्रत्येकी २.५० कोटी रुपये खर्च केले जाणार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
पायाभूत सुविधांचे ‘रोल मॉडेल’ गाव
कोठारी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार मुनगंटीवार सदैव आग्रही राहिले आहेत. यापूर्वी त्यांच्या प्रयत्नातून गावात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागले आहेत. यात प्रामुख्याने नवीन पाणीपुरवठा योजना, पोलीस स्टेशनची नवीन इमारत, सुसज्ज व्यायामशाळा, आणि ईटोली–मानोरा–कोठारी–कवडजई मार्गावरील १ कोटी ५५ लाखांचा रस्ता यांचा समावेश आहे.
. याशिवाय गावात नायब तहसीलदार कार्यालय, संरक्षक भिंत, जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्गखोल्या, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, संत रविदास महाराज समाजभवन आणि हनुमान मंदिर परिसरातील भव्य सभागृह या कामांमुळे कोठारी गाव विकासाच्या मुख्य प्रवाहात अधिक सक्षमपणे उभे राहिले आहे.
नागरिकांना मिळणार मोठा दिलासा
या नवीन कामांमुळे पावसाळ्यात होणारा चिखल, पाणी साचणे आणि सांडपाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आपली कटिबद्धता आमदार मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. या विकासात्मक निर्णयाबद्दल कोठारीवासीयांनी आनंद व्यक्त करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहेत.


