नशेखोर भावाकडून सख्ख्या बहिणीची तलवार उपसून हत्या !
भांडण सोडवायला गेलेली आईही गंभीर जखमी
भद्रावतीत खळबळ
पोलिसांनी आरोपी मुलासह वडिलांना ठोकल्या बेड्या
भद्रावती : शहरातील झिगुजी वॉर्ड, झाडे प्लॉट परिसरात मंगळवारी रात्री ८:४५ च्या सुमारास एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. बेरोजगारी आणि नशेच्या आहारी गेलेल्या एका तरुणाने शुल्लक वादातून आपल्या सख्ख्या बहिणीवर तलवारीने वार करून तिची निर्घृण हत्या केली. या जीवघेण्या हल्ल्यात मयत मुलीची आईदेखील गंभीर जखमी झाली असून, या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला आहे.
नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज बोन्डे हा अनेक दिवसांपासून बेरोजगार होता आणि त्याला नशेचे व्यसन जडले होते. मंगळवारी रात्री घरामध्ये काही कारणावरून वाद झाला. नशेत असलेल्या सूरजचा राग अनावर झाला आणि त्याने घरात असलेली तलवार उपसून बहीणीवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की गंभीर दुखापत झाल्यामुळे बहीणीचा जागीच मृत्यू झाला.
आईची प्रकृती चिंताजनक
भांडण विकोपाला गेलेले पाहून आणि आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आई मध्यस्थी करायला गेली. मात्र, संतापलेल्या सूरजने आईवरही तलवारीने हल्ला केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे समजते.
वडिलांनाही अटक
घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी सूरज बोन्डे याला ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे, या हत्येच्या कटात किंवा सूरजला साथ दिल्याचा संशय असल्यावरून पोलिसांनी त्याच्या वडिलांनाही अटक केली आहे.
नशेचे भीषण वास्तव
बेरोजगारी आणि व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढी कशी हिंसक होत चालली आहे, याचे हे ज्वलंत उदाहरण ठरले आहे. एका हसत्या-खेळत्या संसाराची राखरांगोळी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भद्रावती पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


