Home सामाजिक शहीद झाल्यावर गर्दी होते, मग निवृत्त सैनिकांचा जिवंतपणी सन्मान का नाही ?

शहीद झाल्यावर गर्दी होते, मग निवृत्त सैनिकांचा जिवंतपणी सन्मान का नाही ?

296

नंदोरी येथील शिवजन्मोत्सवात माजी सैनिकांनी व्यक्त केली हृदयस्पर्शी खंत

‘स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीने स्वागत गेटसाठी १ लाख तर दिव्यांग बांधवाला २० हजारांची मदत

युवा प्रतिष्ठानचा कौतुकास्पद पुढाकार

करण ठाकरे

चंद्रपूर : “सैनिक सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देतो, म्हणूनच देशवासीय सण-उत्सव आनंदाने साजरे करू शकतात. मात्र, दुर्दैवाने सैनिक शहीद झाल्यावर निरोप देण्यासाठी जी गर्दी उसळते, तीच ओढ तो सैनिक निवृत्त होऊन मायभूमीत परतल्यावर का दिसत नाही? जिवंतपणी त्याच्या त्यागाचा सन्मान करण्याची तसदी समाज का घेत नाही?” असा बोचरा पण वास्तववादी सवाल माजी सैनिकांनी उपस्थित केला.

.       भद्रावती तालुक्यातील नंदोरी (बु.) येथे युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सवात बुधवारी दि. १८ फेब्रुवारी सायंकाळी माजी सैनिकांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना माजी सैनिकांनी आपल्या मनातील हृदयस्पर्शी खंत व्यक्त केली.

नंदोरीत शिवजन्मोत्सवाचा उत्साह

युवा प्रतिष्ठान नंदोरी (बु.) च्या वतीने १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या काळात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचे मोठ्या थाटात आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे औचित्य साधून १८ फेब्रुवारी रोजी आजी-माजी सैनिक, उत्कृष्ट ग्रामसेवक, पत्रकार रवी खाडे व टोल टॅक्स कर्मचारी रूपेश बलकी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

.        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती भद्रावतीचे माजी सभापती धनराज विरुटकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नंदोरीचे माजी सरपंच मंगेश भोयर, दैनिक ‘नवजीवन’चे जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भानुदास ढवस, ज्येष्ठ नागरिक निळकंठ अवगान आणि नंदोरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपा : धनराज विरुटकर

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पंचायत समिती भद्रावतीचे माजी सभापती धनराज विरुटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला. महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपत समाजात एकता आणि परिवर्तनाची गरज त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केली.

सैनिकांच्या भावनांनी उपस्थितांचे पाणावले डोळे

सत्कार समारंभात बोलताना माजी सैनिकांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “आम्ही जेव्हा देशाच्या सीमेवर रक्षण करतो, तेव्हा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. देशातील नागरिक जेव्हा आनंदाने दिवाळी साजरी करतात, तेव्हा आमचा सैनिक कुटुंबापासून हजारो मैल दूर शत्रूवर नजर ठेवून उभा असतो. सैनिक शहीद होतो तेव्हा निरोप देण्यासाठी हजारो नागरिक गर्दी करतात, पण तोच सैनिक जेव्हा सेवा निवृत्त होऊन घरी परततो, तेव्हा त्याचा योग्य सत्कार किंवा आदर समाजात होत नाही. जिवंतपणी त्याच्या त्यागाचा सन्मान करण्याची तसदी समाज का घेत नाही? समाजाने निवृत्त सैनिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे ही काळाची गरज आहे.” असे मत माजी सैनिकांनी व्यक्त केले.

सांस्कृतिक कार्यक्रम आणि रवींद्र शिंदे यांचे दातृत्व

सायंकाळी ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले. यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावली. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या सर्वांसाठी आदर्श आहेत. योगायोगाने चंद्रपूर च्या शिवजयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे. आज नंदोरी येथे येत असताना मला गावातील स्वागत गेटचे काम सुरू असल्याचे दिसले. या गेटसाठी ‘स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या माध्यमातून १ लाख रुपयांची मदत मी जाहीर करतो. तसेच, गावातील अरविंद पाचभाई या दिव्यांग बांधवाला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी २० हजार रुपयांची मदत जाहीर करत आहे. मी आमदार किंवा खासदार नाही, परंतु माझ्या व्यवसायातून समाजाचे देणे लागते, या हेतूने मी हे सामाजिक कार्य करत असतो.”  असे शिंदे म्हणाले.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे मनोगत व्यक्त करताना.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

उत्सवाचे मुख्य आकर्षण लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम राहिले. संजीवनी ठक घागी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर आश्लेषा भोयर, कार्तिक कामडे आणि रितेश हरणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. युवा प्रतिष्ठानने घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत असून, या सोहळ्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!