ह.भ.प. सोपानदादा कनेरकर महाराज यांचे प्रतिपादन
नंदोरी येथे भव्य शिवजन्मोत्सव सोहळा थाटात
करण ठाकरे
चंद्रपूर : “६ जून रोजी होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन आणि २२ जानेवारी रोजी अयोध्येत झालेली प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा, हे दोन्ही दिवस आपल्यासाठी खऱ्या अर्थाने दिवाळीसारखेच उत्सवाचे सण आहेत,” असे ओजस्वी प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सोपानदादा कनेरकर महाराज यांनी केले. भद्रावती तालुक्यातील नंदोरी (बु.) येथे युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित तीन दिवसीय भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्या दरम्यान कीर्तनातून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
. स्थानिक युवा प्रतिष्ठानच्या वतीने १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचे मोठ्या थाटात आयोजन करण्यात आले होते.
. या शिव महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे संघटक मुकेश जिवतोडे यांनी केले. तर अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती प्रविण ठेंगणे होते. प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी उत्पादक महासंघ चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, माजी सरपंच मंगेश भोयर, दैनिक नवजीवनचे जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे, माजी सदस्य किशोर उमरे, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भानुदास ढवस उपस्थित होते.
संस्कारांतूनच समर्थ समाज घडेल : ग्रामदैवताची सेवा हीच खरी ईश्वरसेवा – सोपानदादा कनेरकर
आजच्या काळात संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करताना ह.भ.प. सोपानदादा कनेरकर महाराज म्हणाले की, “राजमाता जिजाऊंनी बाल शिवबांवर जे संस्कार केले, तेच संस्कार आजच्या माता-भगिनींनी आपल्या मुलांवर करणे ही काळाची गरज आहे. सुसंस्कारित पिढीच भविष्यात समर्थ स्वराज्य आणि समाज घडवू शकेल.” केवळ आध्यात्मिक उपदेशावर न थांबता महाराजांनी सामाजिक स्वच्छतेचा आणि स्थानिक देवस्थानांच्या संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेशही यावेळी दिला. ते म्हणाले, “उज्जैनला जाऊन महादेवाचे दर्शन घेण्यापेक्षा, आपल्या गावातील महादेव मंदिराची सेवा करा आणि मंदिर परिसर स्वच्छ ठेवा. आपल्या ग्रामदैवताचे आणि स्थानिक मंदिरांचे पावित्र्य राखणे हीच खरी ईश्वरसेवा आहे.” या कीर्तन सोहळ्यात महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरक जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. त्यांच्या ओघवत्या शैलीतील विवेचनाने उपस्थित सर्व शिवभक्त मंत्रमुग्ध झाले होते.
स्थापत्यशास्त्राचा चमत्कार आणि संवर्धनाची गरज – मुकेश जिवतोडे
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलताना शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी आजच्या बांधकाम क्षेत्रातील त्रुटींवर बोट ठेवले. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेले गडकिल्ले हे आजही जागतिक स्थापत्यशास्त्राचा अद्भूत नमुना आहेत. शेकडो वर्षे, अनेक नैसर्गिक संकटे आणि युद्धे सोसूनही या किल्ल्यांना आजही भेगा पडलेल्या नाहीत. याउलट, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात केलेली बांधकामे काही दिवसांतच कोसळतात किंवा त्यांना तडे जातात. ही तुलनाच महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष देते. म्हणूनच या किल्ल्यांपासून बोध घेऊन त्यांचे जतन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.” असे म्हणाले.
व्यवस्थापन कौशल्य आणि युवा शक्ती – प्रविण ठेंगणे
कार्यक्रमाचे अध्यक्ष, पंचायत समिती भद्रावतीचे माजी सभापती प्रविण ठेंगणे यांनी युवकांना इतिहासाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला. ते म्हणाले, “शिवरायांचा इतिहास हा केवळ पुस्तकात वाचून विसरण्यासाठी नाही, तर तो धकाधकीच्या जीवनात कृतीत उतरवण्यासाठी आहे. महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, त्यांचे सूक्ष्म नियोजन आणि गनिमी कावा हे आजही व्यवस्थापन शास्त्राचे मोठे धडे आहेत. आजच्या तरुणांनी या धोरणांचा अभ्यास करून स्वतःचे आणि राष्ट्राचे भविष्य घडवावे.” असे म्हणाले.
व्यसनमुक्ती आणि सेंद्रिय आहाराचा मंत्र – नरेंद्र जिवतोडे
शेतकरी उत्पादक महासंघाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र जिवतोडे यांनी समाजातील ज्वलंत आरोग्य प्रश्नावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “महाराजांनी स्वराज्यासाठी मावळे घडवताना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक शक्तीवर भर दिला होता. मात्र, आज आपले गाव आणि तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत अडकत आहे. ग्रामीण भागातील नाल्या खऱ्याच्या (तंबाखूच्या) पन्नीने तुंबलेल्या दिसतात, हे चित्र अत्यंत विदारक आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून वाचायचे असेल, तर तंबाखूचा त्याग करा आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी सेंद्रिय शेती व शुद्ध आहाराचा मार्ग स्वीकारा.”
शिव-शंभूंचा त्याग हाच युवकांचा प्रकाशस्तंभ – मंगेश भोयर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माजी सरपंच मंगेश भोयर यांनी युवकांच्या भूमिकेवर जोर दिला. “केवळ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास ऐकून समाधान मानू नका. त्या दोन महान छत्रपतींनी स्वराज्यासाठी जो त्याग केला आणि जे शौर्य गाजवले, ते आपल्या रक्तात भिनले पाहिजे. शिव-शंभूंचा हा जाज्वल्य वारसाच युवकांना संकटाच्या काळात मार्ग दाखवणारा प्रकाशस्तंभ ठरेल,” असे त्यांनी नमूद केले.
. कार्यक्रमाचे संचालन विनोद लांबट यांनी केले तर आभार माजी सरपंच मंगेश भोयर यांनी मानले. या सोहळ्याला नंदोरी व परिसरातील शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.


