शिवगर्जनांनी अवघी चंद्रपूर नगरी दुमदुमली
२२ शाळा-महाविद्यालयांसह क्रीडा व सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन
चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात गुरुवारी (दि. १९) जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या निर्देशानुसार आयोजित या पदयात्रेला शिवप्रेमी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दिमाखदार प्रारंभ आणि मार्गक्रमण
सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पदयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी महापौर संगीता खांडेकर, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. ही पदयात्रा शिवाजी महाराज स्मारक – महात्मा गांधी चौक – आझाद बगीचा – गिरणार चौक मार्गे जात मनपा पार्किंग येथे विसर्जित झाली.
![]()
विद्यार्थ्यांचे आकर्षण आणि शिवचरित्राचे दर्शन
या रॅलीत २२ शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित वेशभूषा, पोवाडे आणि आकर्षक झाँकी सादर केल्या. एन.एस.एस., एन.सी.सी. आणि खेलो इंडियाच्या खेळाडूंनी शिस्तबद्ध संचलन केले. शिवगर्जना आणि जयघोषांनी संपूर्ण परिसर राष्ट्राभिमानाने ओसंडून वाहत होता.
मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी उपमहापौर प्रशांत दानव, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे (माध्य.), अश्विनी सोनवणे (प्राथ.), जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी संदीप उईके, मोरेश्वर गायकवाड, सुनील आत्राम यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारितोषिक वितरण
रॅलीतील उत्कृष्ट सादरीकरणासाठी मनपा आयुक्तांच्या हस्ते तीन सामूहिक व तीन वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली. यात प्रथम क्रमांक लोकमान्य टिळक कन्या प्राथमिक शाळा (विद्यार्थी निरव चहारे याच्या पोवाड्याला विशेष दाद मिळाली). द्वितीय क्रमांक लोकमान्य टिळक विद्यालय, चंद्रपूर तर तृतीय क्रमांक पीएमश्री सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक शाळा, बाबुपेठ या शाळा-महाविद्यालयांना मिळाला.


