Home सामाजिक माझं आठवणीतलं गाव – अकोला (नं. १)

माझं आठवणीतलं गाव – अकोला (नं. १)

315

माजी विद्यार्थी संघ, शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि समस्त ग्रामवासी अकोला नं. १ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ ला ‘माजी विद्यार्थी स्नेह मिलन मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा खास लेख…

निसर्गसंपन्न आणि सुबक गाव
वरोरा तालुक्याच्या शेवटी वसलेले अकोला हे आमचे सुंदर आणि सुबक गाव. गावाच्या पूर्वेकडून वाहणारी झुळझुळती इरई नदी, सभोवताली असलेली सुपीक जमीन आणि हिरवेगार रान—अशा निसर्गरम्य परिसरात आमचे गाव वसले होते. गावातील दर्शनी भागातून सुरू झालेले प्रशस्त रस्ते, सुंदर कौलारू घरे आणि जणू काही नियोजनबद्ध बसवलेले चौक ही आमच्या आदर्श गावाची ओळख होती.

दळणवळण आणि भक्तीचा वारसा
आमच्या गावापासून चारी बाजूंनी अकोला ते चारगाव, राळेगाव, गुजगव्हाण, पारडी, गिरोला, सावरी आणि बोरगाव असे गावोगावी जोडणारे रस्ते होते. त्यावेळी जरी रस्ते कच्चे असले, तरी बैलगाडीने प्रवास करणे अतिशय सोयीचे व आनंदाचे होते. गावाच्या दक्षिणेला हनुमान मंदिर होते, तर विठ्ठल-रुक्माईचे मंदिर हे आमचे आराध्य दैवत. नित्यनेमाने होणारे भजन-पूजनाचे कार्यक्रम गावाला अध्यात्माची सुंदर जोड लाभली होती.

संस्कार आणि सामाजिक एकोपा
आमच्या गावात सर्व धर्म व जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते. गावाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आशीर्वाद लाभले होते. त्यांचे शिष्य स्वर्गीय गणपतरावजी डवरे यांच्या माध्यमातून गुरुदेव सेवा मंडळामार्फत प्रबोधनाचे कार्य व प्रार्थना नित्यनेमाने चालत असे. त्यातूनच गावाचा आदर्श व विकास साधला जात होता. याचेच फळ म्हणजे गावातील छोटे-मोठे भांडण-तंटे गावातच निस्तारले जात. गावातील कोणताही गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल नसल्यामुळे, तत्कालीन पोलीस पाटील स्वर्गीय नानाजी पाटील उमरे यांचा पोलीस स्टेशनमार्फत सत्कार करण्यात आला होता. यामुळे आमच्या गावाचा प्रभाव आजूबाजूच्या गावांवरही पडत असे.

प्रभावी नेतृत्व आणि समृद्ध संस्कृती
गावातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय स्वर्गीय तुळशीराम पाटील उमरे. ते त्या काळी पंचायत समिती, वरोरा येथील सभापती होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गाव एकजुटीने त्यांच्या कार्याला साथ देत होते. गावातील कोणतेही सार्वजनिक किंवा घरगुती कार्य असो, संपूर्ण गाव आनंदाने सहभागी होत असे. विशेषतः या कार्यांचे नेतृत्व स्वर्गीय सखारामजी नन्नावरे करीत असत. गावातील सर्व लोक एकमेकांचा आदर-सन्मान राखत असत—हीच आमच्या गावाची संस्कृती होती.

शैक्षणिक वातावरण आणि आमची शाळा
पूर्वीपासून या गावाला शिक्षणाचा वारसा लाभलेला होता. आम्ही लहान असताना स्वर्गीय उमरे गुरुजी, स्वर्गीय मटाले गुरुजी, स्वर्गीय डाखरेजी आणि इतर अनेक शिक्षित मंडळी होती. त्यामुळे गावातील लोकांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण झाली होती. आमची प्राथमिक शाळा ‘लाखात एक’ होती, कारण शाळेला समर्पित आणि संस्कारी शिक्षक लाभले होते. ठावरी गुरुजी व स्वर्गीय नक्षीने गुरुजी माझे गुरुवर्य होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची शाळा तालुका स्तरावर नावाजलेली होती.

चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेत मी तालुक्यात प्रथम आलो होतो. पुढील वर्षी माझे लहान भाऊ प्रभाकर मोडक तसेच विनोद ठावरी यांना पब्लिक स्कूल, चिखलदरा येथे निवडीचा मान मिळाला (मात्र उशीर झाल्यामुळे विनोद ठावरी तिथे प्रवेश घेऊ शकले नाहीत). माध्यमिक शिक्षणासाठी तालुक्याला गेल्यानंतर आमच्या गावातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक ठसा स्पष्ट दिसत असे. ‘सुंदर अक्षर’ ही तर आमच्या गावाची ओळख होती. जिद्दीने अभ्यास करून अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर झाले आणि शासनाच्या सेवेत हातभार लावला.

मैत्रीच्या आठवणी आणि सण-उत्सव
गावातील लोक प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरा करत. सुट्टीमध्ये बाहेरगावी गेलेली मंडळी गावात सहभागी होत. दिवाळीच्या सुट्टीत वासुदेव भाऊ मटाले, कमलाकर भाऊ उमरे, स्वर्गीय वसंत भाऊ उमरे, पुरुषोत्तम भाऊ उमरे, स्वर्गीय घनश्याम भाऊ उमरे, गुलाब भाऊ उमरे, देविदास भाऊ बोथले आणि इतर तरुण मैदानी खेळांचे नियोजन करीत. शामराव मटाले, दामाजी मटाले, सुरेश वानकर, स्वर्गीय नरेश उमरे आणि इतर समवयस्क मित्रांचे ‘वनभोजन’ इरई नदीच्या काठावर वर्षातून एकदा ठरलेले असायचे. गावातील नाटके आणि तमाशाच्या कार्यक्रमात दौलतराव कुमरे परिवार विशेषतः अग्रेसर असे.

विस्थापन आणि शतकोटी प्रणाम
अशा या सुंदर, समृद्ध व प्रगत गावाला नजर लागली. चारगाव धरणामुळे सन १९७७-७८ मध्ये आमचे गाव विस्थापित झाले आणि आमचे आदर्श गाव विखुरले गेले. तरीही या गावाविषयीचे प्रेम आमच्या हृदयात सदैव कोरलेले आहे.

अशा माझ्या महान, समृद्ध गावास शतकोटी प्रणाम !

जुन्या गावाच्या आठवणी जागृत करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करणारे अरुण उमरे व सर्व गावकऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

भास्कर मोडक (सेवानिवृत्त अभियंता, नागपूर)

error: Content is protected !!