किल्ल्याच्या भव्य प्रतिकृतीने वेधले सर्वांचे लक्ष
डीजेच्या गोंगाटाऐवजी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि श्रमदानातून शिवजयंती साजरी
ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम
भद्रावती : तालुक्यातील घोनाड येथे शिवजयंतीचा उत्साह यंदा सातव्या आकाशाला भिडला होता. “किल्ले प्रतापगड”च्या गेल्या वर्षीच्या यशानंतर, यंदाही गावातील युवकांनी स्वराज्याच्या स्थापनेतील एका ऐतिहासिक किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारून शिवरायांना आगळेवेगळे अभिवादन केले. केवळ मिरवणूकच नाही, तर सामाजिक भान जपत गावातील तरुणांनी श्रमदानातून संपूर्ण गाव स्वच्छ करून उत्सवाची सुरुवात केली.
. सोहळ्यात लेझीमच्या तालावर ठेका धरणाऱ्या शालेय विद्यार्थिनी आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने अवघे गाव दुमदुमले होते. रात्रीच्या वेळी दीपोत्सवाने गावाला जणू दिवाळीचे स्वरूप प्राप्त झाले होते. डीजे किंवा डॉल्बीचा वापर टाळून, पारंपरिक पद्धतीने आणि शिस्तबद्ध रीतीने उत्सव साजरा करण्याचा घोनाडचा हा आदर्श इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. महाप्रसादाने या मंगलमयी सोहळ्याची सांगता झाली.


