Home सामाजिक हत्तीरोग निर्मूलनासाठी औषधोपचार मोहिमेत सहभागी व्हा

हत्तीरोग निर्मूलनासाठी औषधोपचार मोहिमेत सहभागी व्हा

276

आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

१० ते २३ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात मोहीम

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली औषध घेण्याच्या सूचना 

चंद्रपूर : जिल्ह्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘सार्वत्रिक औषधोपचार’ मोहिमेत सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. आरोग्य विभागाकडून दिली जाणारी प्रतिबंधात्मक औषधे वेळेवर सेवन करून जिल्हा हत्तीरोगमुक्त करण्यास मदत करावी, असे त्यांनी नमूद केले.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत राष्ट्रीय हत्तीरोग दूरिकरण कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात १० ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत दोन वर्षांखालील बालके, गर्भवती माता आणि गंभीर आजारी व्यक्ती वगळता सर्व पात्र नागरिकांना घरपोच औषधे दिली जाणार आहेत.

आरोग्य कर्मचाऱ्यांसमोरच घ्या औषधे
आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, ही औषधे पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहेत. नागरिकांनी ही औषधे उपाशीपोटी घेऊ नयेत आणि आशा स्वयंसेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच त्याचे सेवन करावे. रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने न चुकता औषध घेणे आवश्यक आहे.

लोकसहभागाची गरज
या मोहिमेच्या यशासाठी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रशासनाने सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. “हत्तीरोगमुक्त महाराष्ट्र” घडवण्यासाठी नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले आहे.

error: Content is protected !!